भावडबारी- देवळा मार्गावर नंदुरबार- नाशिक एसटी बसचा मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने कंटेनरला धडक दिली असून या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर देवळा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नंदूरबार- नाशिक ही एसटी बस भावडबारी घाटातून जात होती. यादरम्यान बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बस आणि कंटेनरच्या एका बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असल्याचे समजते. चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली.