पुण्यातील विशेष न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात प्रकरणात ११ वर्षांनी आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोप होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी ठरवत विशेष न्यायाधीशांनी जन्मठेप सुनावली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचं आमचं आजही म्हणणं आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी पुरावा न दिल्याने तिघांना सोडण्यात आलं

“डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल ११ वर्षांनी लागला. पोलिसांनी पुरावा सादर न केल्याने तिघांना सोडण्यात आलं. हा एक कट होता. त्यात कोण सामील होतं हे समोर आलेलं नाही. सनातन संस्थेचे लोक कटात सहभागी होते, असं म्हटलं होतं. सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचं वक्तव्य ऐकलं. हा कट कुठे शिजला? मुख्य सूत्रधार कोण ते समजलेलं नाही, सगळं दडपण्यात आलं आहे असं मला वाटतं. सनातन संस्थेच्या तारा कुठे जुळतात ते समोर आलं नाही का? ज्या प्रवृत्तींनी गांधींचा खून केला त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा खून केला हे मी आधीही म्हणालो होतो आणि आत्ताही म्हणतो आहे.” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सनातन ही दहशतवादी संघटना

“सनातन संस्था ही दहशतवादी संस्था आहे असं माझं मत आहे. मी मुख्यमंत्री असताना सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी आणा अशी मागणी आम्ही तेव्हा गृहमंत्रालयाकडे केली होती. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होण्याच्या दोन वर्ष आधी ही बंदी घालण्याची मागणी आम्ही केली होती. तसंच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पत्र लिहिलं होतं. सनातन संस्थेचा सहभाग नेमका कसा होता ते स्पष्ट झालेलं नाही. सनातन संस्थेवर बंदी घालावी ही मागणी अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. दाभोलकर प्रकरणात जो निकाल देण्यात आला त्यावर मी समाधानी नाही.” असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

निकालावर समाधान व्यक्त करण्यासारखं काहीही नाही

“दोन लोकांनी हे मान्य केलं आहे की, आम्ही दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांनाच शिक्षा झाली. नंतर देखील गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यामुळे तपास योग्य झाला नाही. या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्याची कुठलीही गरज नाही”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलंं आहे.

हे पण वाचा- उच्च न्यायालयात जाण्याचा दाभोलकर कुटुंबीयांचा निर्णय; मख्य सूत्रधाराला शोधण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याने नाराजी

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कधी आणि कशी?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader prithviraj chavan reaction on narendra dabholkar murder case scj