कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सत्ताधारी पक्षांनी आपले संख्याबळ कायम राखले असून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत पक्षादेश भंग केल्याने  पक्षांतरबंदी कायद्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे हे दोन नगरसेवक अपात्र ठरले होते. या रिक्त जागासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

सिध्दार्थनगर प्रभागातील नगरसेवक अफजल पिरजादे यांना अपात्र ठरवल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागातून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे जय पटकारे,शिवसेनेने पाठिंबा दिलेले सुशील भांदिगरे आणि ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनूले अशी तिरंगी लढत होती. पटकारे यांना १५८०, भांदीगरे ८४० तर सोनूले १२०९ अशी मते पडली.

पद्माराजे प्रभागात अजिंक्य चव्हाण हे अपात्र ठरल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागात राष्ट्रवादीचे अजित राऊत, शिवसेनेचे पियुष चव्हाण यांच्यासह अन्य ४ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुरंगी होती. राऊत यांनी सर्वाधिक १७०६ मते घेऊन निवडणूक एकतर्फी जिंकली. पियुष चव्हाण यांना ६४३,महेश चौगुले यांना ३४४तर राजेंद्र चव्हाण यांना ३३४ मते मिळाली.

सिद्धार्थनगर या भागात निवडणूक जिंकल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ एकने संख्या वाढले आहे. दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवारास निवडून आणून आमदार सतेज पाटील यांनी यशाची घौडदौड कायम ठेवली आहे. तर, राऊत यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.