Premium

“मुंह खोलने से पहले…”, कायदा-सुव्यवस्थेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंचं शायरीतून उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांसाठी पुढच्या वेळी पानसुपारीचा कार्यक्रम ठेवावा लागेल.

Eknath SHinde
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी महायुतीनेदेखील पत्रकार परिषद बोलावली होती. (PC : Eknath Shinde/X)

विधीमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन बुधवारपासून म्हणजेच ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने पंरपरेप्रमाणे विरोधी पक्षांना चहापानाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. मात्र विरोधी पक्षांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचं कारण सांगितलं. या पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही, आरक्षणाच्या प्रश्नामुळे संघर्ष चालू आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही, चर्चा करत नाही. राज्यापुढे गंभीर प्रश्न असताना चहापानाला जाणं योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी महायुतीनेदेखील पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासाठी सुपारी पान ठेवायला हवं. त्यांची सवय पाहता पानसुपारीच्या कार्यक्रमाला ते येतील.” तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु, विरोधी पक्षांनी दिलेल्या पत्रात विदर्भाचा एकही मुद्दा नाही. तसेच या पत्रावर २३ नेत्यांची नावं आहेत. मात्र, त्यावर केवळ सातच आमदारांनी सह्या केल्या आहेत. बाकीचे नेते पत्रकार परिषदेत झोपले होते, त्याचप्रमाणे सह्या करायच्या वेळेसही झोपले असतील.

हे ही वाचा >> “विरोधकांचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “लोकसभेत याहून वाईट…!”

दरम्यान, राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायरीतून उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले, मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें! तुम्ही लोक आधी तुमचं बघा आणि मग सरकारवर टीका करा. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हे इंडिया आघाडीवाले खूप मोठ्या-मोठ्या बाता मारत होते. परंतु, निकलानंतर काहीच बोलत नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde reply to opposition parties over criticizing government asc

First published on: 06-12-2023 at 19:13 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा