केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याची आणि तुटलेपणाची भावना शेतकऱयांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्याशी झालेला संवाद अस्वस्थ करणारा होता. त्यांना धीर द्यायला आणि त्यांच्यासाठी लढायला आपण इथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी तोंगलाबादमध्ये व्यक्त केली.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी गुरुवारी विदर्भाच्या दौऱयावर आहेत. या दौऱयामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱयांचे प्रामुख्याने तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. कर्जमाफी व्हायला हवी, अशी लोकांची मागणी आहे. ज्या आत्महत्या होत आहेत. त्या कर्जबाजारीपणामुळेच होत आहेत. त्याचबरोबर शेतकऱयांच्या मालाला किमान आधारभूत किंमत वाढवून मिळाली पाहिजे. पूर्वी त्यांना बोनस मिळत होता. आता बोनसही मिळत नाही. ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना मदत करायला हवी, तशी मदत त्यांना मिळत नाही. त्यामुळेच सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची त्यांची भावना आहे.
आत्महत्या करणारे शेतकरी भित्रे आहेत, असे हरियाणातील एका मंत्र्याने म्हटले. केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात, विदर्भात फक्त तीन शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. या वक्तव्यांचा उल्लेख करून ते म्हणाले, शेतकऱयांनी घाबरून जाऊ नये. आम्ही त्यांच्यासाठी लढायला तयार आहोत. हा विश्वास त्यांना देण्यासाठी मी इथे आलो आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह कॉंग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.