इंदू मिलच्या जागेचे श्रेय लाटण्यावरून विधान परिषदेत शाब्दिक चकमक झाली. जागा मिळण्यासाठी ५६ वर्षे लागली तसेच स्मारक उभारायला ५६ वर्षे लागू नयेत, अशा तीव्र भावना सदस्यांनी व्यक्त केली. इंदू मिलवरील चर्चा आज अपूर्ण ठेवण्यात आली.
इंदू मिलची साडेबारा एकर जागा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकास मिळावी यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने केलेल्या ठरावाची आणि राज्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्याने केलेला पाठपुरावा यावर सुभाष चव्हाण यांनी विस्तृत भाष्य केले. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाने (एनटीसी) देऊ केलेल्या जागेसंबंधी चव्हाण यांचा प्रस्ताव होता. ती जागा मिळविताना श्रेय लाटण्यावरून सदस्यांची शाब्दिक चकमक झाली. इंदू मिलची जागा स्मारकाला मिळणे ही ऐतिहासिक घटना असून कुठल्याही प्रकारचे आक्षेप कुणी कुणाविरुद्ध घेऊ नयेत, अशी तंबी सभापतींनी सदस्यांना दिली.