मिरजेतील पाडव्याच्या पंचांगातील भाकीत

यंदाच्या पावसाचे निवासस्थान परटाच्या घरी असून मृग नक्षत्राचे वाहन मेंढा असल्याने खरिपाच्या पेऱ्याला ढगाकडे बघावे लागणार आहे. मात्र रब्बीला अनुकूल स्थिती असेल असे भाकीत मंगळवारी सार्वजनिक पंचांगवाचनातून सांगण्यात आले. पाऊस सरासरी गाठणारा असला, तरी खंडित असल्याने खरिपाला फटका बसण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त सायंकाळी ग्रामीण भागात चावडीकट्टय़ावर सार्वजनिक पंचांगवाचन करण्यात आले. तत्पूर्वी गावच्या वतनदार पाटलांच्या हस्ते नवीन पंचांगाचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर कडूिलब, गूळ, खोबरे, हरभरा डाळीचे भिजावणे याचे मिश्रण असलेल्या प्रसादाचे वाटप ग्रामदैवताच्या गुरवाकडून उपस्थितांना करण्यात आले. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे पंचांगाचे सामूहिक वाचन करण्यात आले. या वेळी गावचे पोलीस पाटील तानाजी पाटील, मुलकी पाटील पांडुरंग पाटील यांच्या हस्ते पंचांगपूजनानंतर गावातील भटजी बाळू जोशी यांनी पंचांगवाचन केले.

भटजींनी पंचांगवाचन करीत असताना यंदाच्या हंगामातील पावसाची स्थिती कथन केली. या वर्षी मेघगर्जनेसह रोहिणीचा पाऊस पडणार असला, तरी सध्या असलेल्या ढगाळ हवामानाच्या गर्भाळ नक्षत्रामुळे खरिपातील नक्षत्र कोरडे जाण्याचा धोकाही सांगितला.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

चालू वर्षी पावसाचे निवासस्थान धोब्याच्या म्हणजेच परटाच्या घरी आहे. धुणे पिळल्यासारखा पाऊस पिकांना पिळून काढण्याची भीती वयस्कर शेतकरी वर्गातून व्यक्त होत असली तरी मिरगाचे वाहन मेंढा असल्याने पाऊस होईल असा आशावादही व्यक्त करण्यात आला. एकूण २७ नक्षत्रांपकी पावसाची नक्षत्रे ११ असली, तरी यामधील केवळ ९ नक्षत्रांचाच उपयोग पिकासाठी होत असल्याने याचाच विचार पंचांगवाचनात प्रामुख्याने केला जातो.

यंदाच्या हंगामातील नक्षत्र आणि त्यांचे वाहन पुढीलप्रमाणे असतील मृग-मेंढा, आद्र्रा- म्हैस, पुनर्वसू- कोल्हा, पुष्य- उंदीर, आश्लेषा- घोडा, मघा- मेंढा, पूर्वा- गाढव, उत्तरा- बेडूक, हस्त- उंदीर, चित्रा- घोडा आणि स्वाती- घोडा. यापकी पहिली पाच नक्षत्रेही खरिपासाठी उपयुक्त ठरतात, तर शेवटच्या दोन नक्षत्रांचा पाऊस पडला तर पडला अन्यथा पडत नाही. या वेळी परतीचा मान्सून सुरू झालेला असतो. मधली मघापासून उत्तरापर्यंतची नक्षत्रे रब्बीसाठी पोषक आणि महत्त्वाची असतात.

यामध्ये बेडूक, मेंढा, गाढव ही वाहने असणारी नक्षत्रे चांगली पडतील, मात्र कोल्हा नक्षत्र हुलकावणी देणारी ठरतील, घोडा हा वेगवान प्राणी असल्याने पाऊस पडला तर पडेल अन्यथा दिशाभूलही होण्याचा संभव आहे. बेडूक, हत्ती, गाढव, म्हैस, मेंढा ही वाहन असलेली नक्षत्रे जास्त पावसाची निदर्शक मानली जातात, तर मोर, कोल्हा, घोडा या वाहनाची पर्जन्यसूचकता कमी पावसाची मानली जातात.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]