लातूर शहरात वर्षांनुवर्षे काँग्रेसची सत्ता होती. गतवर्षी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे चारचाकी वाहनातून उतरून दुचाकीवर प्रचाराच्या सभेत उपस्थित राहिले. प्रसारमाध्यमांनी वाहतुकीची कोंडी पालकमंत्र्यांना दुचाकीवर कशी बसवायला लावली हे दाखवले. पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे काढत सामान्य माणसांना कसे जगणे अवघड झाले आहे. आपल्या हाती सत्ता आली तर सर्व प्रश्न सोडवू. वाहतुकीचा प्रश्न तर अवघ्या पंधरा दिवसांत सोडवला जाईल असे आश्वासन दिले. पाहता पाहता वर्ष संपले. वाहतुकीचा प्रश्न सोडवणे तर सोडाच पूर्वीपेक्षा जटिल बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील प्रत्येक चौकात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे घोषित केले. चांगली बाब अशी की या घोषणेला मूर्तरूप आले. सीसीटीव्ही बसले. कंत्राटदारांची सोय झाली. शहरातील चौकात सिग्नल्स उभे राहिले मात्र ज्यासाठी या सुविधा केल्या त्या वाहतूक व्यवस्थेच्या शिस्तीचे काय, असे प्रश्न विचारला तर उत्तर मात्र मोठे शून्य उरते.

गेल्या आठवडय़ात फिरायला गेलेले बन्सीलाल भराडीया व हरिप्रसाद भराडीया हे दोघे पदपथावरून घराकडे सकाळी सहाच्या दरम्यान निघाले होते. मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने या दोघांना उडवले. यात हरिप्रसाद भराडीया जखमी झाले तर बन्सीलाल भराडीया यांच्या छातीवरून वाहनाचे चाक गेले व ते जागीच गतप्राण झाले. तहसीलसमोरील सीसीटीव्ही वीज बचतीसाठी बंद करण्यात आलेला होता. समोरच्या अशोक हॉटेल चौकातील सीसीटीव्ही सुरू होता. त्यात वाहन दिसले मात्र त्या वाहनाचा गाडी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्यामुळे अद्याप वाहनचालक व वाहन पोलिसांच्या हाती आले नाही. या अपघाताचे वानगीदाखल उदाहरण घेतले आहे. अशी उदाहरणे चौकाचौकात सापडतात.

शहरात चारचाकी, तीनचाकी, दुचाकी या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारची शिस्त नाही. लातूर शहर हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. दुचाकी वाहन चालवतात मात्र त्यांच्याकडे परवाना नसतो. त्यांना परवाना नसल्याची कोणतीच चिंता वाटत नसते, कारण परवाना असला काय अन् नसला काय त्याने फारसा फरक पडत नसतो.

वाहतुकीच्या शिस्तीसंबंधी पोलीस यंत्रणेला विचारले तर त्यांची उत्तरे ठरलेली असतात. आम्ही मागील महिन्यात नियम डावलून वाहन चालवणाऱ्यांकडून किती दंड वसूल केला? तो दंड राज्यात सर्वात जास्त आम्हीच कसा वसूल केला? असे सांगताना शहराच्या वाहतुकीसाठी अपेक्षित पोलिसांच्या ५० टक्केच आमची संख्या आहे तरीही आम्ही कार्यक्षमपणे काम करत आहोत. आम्ही तरी किती काम करायचे? या उत्तराला समोरून प्रतिप्रश्नच येत नसतो.

आपल्या पाल्यांना शाळेत व शिकवणी वर्गासाठी दूरवर जावे लागते त्यामुळे दुचाकी स्वयंचलित वाहन त्याला घेऊन दिल्याशिवाय पर्याय नाही अशी मानसिकता असते. वाहन देताना त्याला ते नीट चालवता येते का? वाहतुकीचे नियम त्याला माहीत आहेत का? याची काळजी फारशी कोणी करताना दिसत नाही.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास नसल्याच्या बरोबर आहे. शहरात केवळ तीन शहर वाहतुकीच्या बसेस चालतात. हजारो रिक्षा चालतात त्यांना तर रस्त्यात कुठेही थांबण्याचा परवाना वाहतूक शाखेने दिला आहे. शहरात रिक्षा चालवायचा परवाना नसला तरी कुठेही थांबायचा परवाना मात्र त्यांच्याकडे असतो. त्यांना हटकण्याची हिंमत कोणाकडेच नसते. त्यामुळे एकूणच लातूरमधील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

वाहतूक नियमांबद्दलची जागरूकता व वाहन चालवताना घेण्याची काळजी यासंबंधी पालकांनी अतिशय जागरूक असले पाहिजे व त्याची पुरेशी माहिती आपल्या पाल्यांना दिली पाहिजे.

– लक्ष्मण राख, लातूर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक

शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध ठिकाणी वाहनतळ निर्माण केले पाहिजेत. काही भागात वाहन चालवण्यास बंदी केली पाहिजे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली गेली पाहिजे.

– संजय पांडे, ज्येष्ठ विधिज्ञ

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur city traffic problems become more complicated
Show comments