ज्येष्ठ पर्यावरणअभ्यासक डॉ. माधव गाडगीळ हे जेजुरी येथे गाढवांच्या बाजाराला गेले आणि रविवारी स्वत:हून गाढवावर स्वारही झाले.. कारण त्यांना एक जुने ऋण फेडायचे होते, त्यांचे आणि त्यांच्या आईचेसुद्धा! त्यांनी ऋण फेडलेच, पण त्यांच्या या कृतीने गाढवाची महतीही वाढली.
जेजुरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार भरतो. गेल्या रविवारी (२७ जानेवारी) तिथे असाच बाजार भरला होता. हा बाजार पाहण्यासाठी डॉ. गाडगीळ तिथे गेले. कुतूहलाबरोबरच जुनी आठवणही त्यांच्या मनात होती. इतकी जुनी की शंभर वर्षांच्याही आधीची, त्यांच्या आईच्या जन्माच्या वेळची! त्यांची आई गाढवाच्या दुधामुळे जगली होती. वर्ष होते १९०९ आणि ठिकाण होते सातारा. गाडगीळ यांच्या आईची आधीची सहा भावंडं जन्मानंतर दगावली होती. त्यामुळे गाडगीळ यांच्या आजोबांनी वैद्यांचा सल्ला घेतला. आजीच्या दुधात दोष असल्यामुळे आधीची मुलं दगावल्याचे त्यांना सांगितले. त्यावर उपाय म्हणून बाळाला गाढविणीचं दूध पाजायला सांगितलं. त्यानुसार त्या वेळी चार दुभत्या गाढविणी आणल्या होत्या. विशेष म्हणजे गाडगीळ यांच्या आईला हे दूध पाजण्यात आलं आणि ती जगलीसुद्धा. गाडगीळ यांनी आईकडूनच ही आठवण ऐकली होती. त्यामुळे गाढवांचा बाजार पाहण्यासाठी गेले होतो, असेही त्यांनी सांगितले.