Premium

आंदोलन गुंडाळण्यासाठी ५० खोक्यांची ऑफर? मॅनेज होण्याबद्दल मनोज जरांगे स्पष्टच बोलले

मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन गुंडाळण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले का? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं.

Manoj Jarnge Patil
"…म्हणून समाजाशी गद्दारी करणं शक्य नाही", जरांगे-पाटलांचं विधान

मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यात उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. जरांगे पाटील हे अनेक मराठा आंदोलकांसह ऑगस्ट २०२३ मध्ये अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसले होते. परंतु, १ सप्टेंबर रोजी या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक आंदोलक यात जखमी झाले. त्यानंतर जरांगे पाटलांचं हे आंदोलन देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राज्यभरातून या आंदोलनाला समर्थन मिळू लागलं. परिणामी राज्य सरकारला या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहणं भाग पडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं, तसेच मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. या मागणीसह ते उपोषणाला बसले होते. राज्यभरातून या आंदोलनाला समर्थन मिळू लागल्यानंतर आणि मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आमदार, खासदार, मंत्री जालन्यात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊ लागले, त्यांची समजूत काढू लागले. परंतु, मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांचं आंदोलन सुरूच आहे त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी जनजागृती करण्यासाठी जरांगे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. याचदरमयान, आज ते उस्मानाबादमधील कळंब येथे गेले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच आंदोलन मागे घ्यावं यासाठी नेत्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला का? किंवा कोणी ५ – ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती का? अशा प्रश्नांवर उत्तर दिलं. मुद्द्याचं बोलू या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला पैशांचं कोणी बोलूच शकत नाही. खरं सांगतोय मी… मला तसं काही बोलले असते, तर मी थेट बोललो असतो… मी काही पोटात ठेवलं नसतं…आणि सर्व समाजाला सांगितलं असतं की हे लोक मला असं बोलतायत…कारण मला भिडभाड नाही..आपलं जे असतं ते दणकून असतं…त्यामुळे ते असं म्हणूच शकत नाहीत…कारण मला ते अनेक वर्षांपासून बघतायत…त्यांनी माझी आंदोलनं हातळली आहेत, आज आहेत त्यांनीपण आणि अगोदरच्यांनी पण माझी आंदोलनं बघितली आहेत…त्यांना सगळं माहिती आहे.

हे ही वाचा >> “भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”

जरांगे पाटील म्हणाले, मी यांच्या (नेत्यांच्या) गाडीतसुद्धा बसत नाही. कधी मुंबईला वगैरे एखाद्या बैठकीला जायचं असेल तर आम्ही आमची वर्गणी काढतो, गाडी ठरवतो आणि आमची सगळी माणसं जातो. त्यांच्याबरोबर जेवतसुद्धा नाही. वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि आजवर माझं असंच काम राहिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil answer on did politicians try to manage maratha reservation protest asc

First published on: 05-10-2023 at 20:54 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा