मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत. तसंच त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता असं जरांगे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आदर्श आचारसंहित लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतो आहे. पण मी शांत बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे मनोज जरांगेंनी?

“आम्हाला जाणीवपूर्वक अडचणींत आणण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत हे केलं गेलं. मात्र न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. खरंतर सरकारने ही भूमिका घ्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. ज्या जनतेच्या जिवावर मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करतं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी आहे. आंदोलन, कार्यक्रम चार महिन्यांपूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल केले जात आहेत. जेसीबी लावले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं सुरु केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली आहे. मी फुटणार नाही, हटणार नाही. कायद्याचं पालन करणार आहे. आदर्श आचारसंहिता आहे तोपर्यंत यांना पुन्हा सुख मिळतंय हरकत नाही. पण मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ” असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांच्या मनात आकस

“माझ्या समाजाविषयी म्हणजेच मराठा समाजाविषयी द्वेष व्यक्त होतो आहे. आता बाकीच्या जाती-धर्माच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर आहे. पोलीस करत आहेत असं सांगितलं जातं आहे. पण गृहमंत्री आमच्या विरोधात आकसाने वागत आहेत” असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीसांसारखा खुनशी..”, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांनी मला तीन वाजता फोन केला

“मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला होता. गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं. त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले. एक वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही. त्यानंतर पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही. पण कारवाया सुरुच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे असंच दिसतं आहे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही. दुसरीकडून कारवाया सुरुच आहेत. ” असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange said devendra fadnavis called at 3 am and said this thing rno news scj
First published on: 20-03-2024 at 20:20 IST