करोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मानसिक रूग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत दिसून आल्याने दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाने मोबाईलद्वारे समुपदेशन करत रूग्णांना दिलासा देणे सुरू केले आहे.

प्रामुख्याने मद्यपींमध्ये विविध विकार आढळून येत असल्याची आकडेवारी आहे. दारूबंदी जिल्हा असला तरी व्यसनाची तलफ भागविण्यात येनकेनप्रकारे यशस्वी होणाऱ्या मद्यपींना संचारबंदीत मात्र फटका बसला आहे. त्यातूनच अस्वस्थता वाढलेले असे रूग्ण विविध मानसिक आजारांना बळी पडत असल्याचे विद्यापिठाच्या मानसोपचार केंद्राचे संचालक डॉ. प्रकाश बेहरे यांनी सांगितले आहे.

दारूअभावी रक्तदाब वाढणे, हृदयरोगाची लक्षणे, चिडचिड दिसून येत आहे. विद्यापिठाच्या आचार्य विनोबा भावे रूग्णालयात फेब्रुवारीमध्ये दाखल अशा रूग्णांपेक्षा मार्च व एप्रिल महिन्यात वाढ झालेली आहे. संचारबंदीच्या काळात अशा रूग्णांवर प्रामुख्याने उपचार झाले. मद्याअभावी सैरभैर झालेल्या अशा व्यक्तींवर उपचार करण्याचे प्रमाण ५० टक्याने वाढल्याचे डॉ. बेहरे म्हणाले. दारूचा अभाव, रोजगार नसल्याने दारू घेण्यासाठी पैसे नसणे तसेच घरातच बंदीस्त झाल्याने व्यसन करण्याची संधी न मिळणे, अशी वेगवेगळे कारणे पुढे आली आहेत.

या पार्श्वभूमीवर मेघे विद्यापिठाने समुपदेशनाच्या माध्यामातून अशा रूग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दवाखान्यात न येवू शकणाऱ्या व्यक्तींना मोबाईद्वारे सल्ला देतांना ही दारू सोडण्याची उत्तम संधी असल्याचे पटवून दिल्या जाते. व्हिटॅमिन बी‑१ च्या गोळ्याबाबत माहिती दिल्या जाते. दारूची आसक्ती कमी व्हावी म्हणून काही औषधी सुचविल्या जातात. कुटुंबातील सदस्यांशी बोलून अशा व्यक्तींशी जास्तीत जास्त संवाद साधण्याची सूचना केल्या जाते. फोनद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीचा अनेकांनी या काही दिवसात लाभ घेतल्याचे डॉ. बेहरे यांनी सांगितले.