अंतर्गत गटबाजी रोखण्याचे पक्षापुढे मोठे आव्हान

एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

पाच वर्षांपूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद होती. या पक्षाचे ज्येष्ठ नेते, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव होता. सोलापूर महापालिकेत वर्षांनुवर्षे काँग्रेसचीच सत्ता होती. त्या तुलनेत भाजपची ताकद खूपच कमी होती. मोदी लाटेत सोलापुरातही सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव करून भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली तर दुसरीकडे जिल्हा परिषदेतही नामधारी का होईना, भाजपप्रणीत महाआघाडीने सत्ता काबीज केली. परंतु गेल्या साडेचार वर्षांचे सिंहावलोकन करता सोलापुरात भाजपला सत्ताकारण करताना अंतर्गत गटबाजीने पूर्णत: पोखरले गेले आहे.

सोलापूर भाजपमध्ये दोन मंत्र्यांमध्ये देशमुखीचा उभा वाद वाढत गेला. त्याचा मोठा फटका स्थानिक विकास कामांवर झाला असताना त्यातच खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी मोठीच निराशा केलेली. पक्षांतर्गत विकोपाला गेलेली गटबाजी आणि त्यातून पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे निघत असताना सत्ताधारी म्हणून भाजपच्या विरोधात जनमानसात प्रचंड निराशा वाढली आहे. भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष वाईट नव्हता, अशीच भावना सार्वत्रिक स्वरूपात वाढीला लागली असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ९ जानेवारी रोजी सोलापूरच्या भेटीवर येत आहेत. स्थानिक पातळीवर मलिन झालेली पक्षाची प्रतिमा पुसून काढण्यासाठी आणि पक्षाला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी मोदींची ही भेट महत्त्वाचा दुवा ठरण्यासाठी सोलापुरातील भाजप व संघ  परिवार प्रयत्नशील आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव मतदारसंघात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी एक लाख ४० हजारांच्या  मताधिक्याने पराभव केला होता. पुढे विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रभाव या जिल्ह्य़ात रोखण्यात दोन्ही काँग्रेसला यश आले तरी भाजपचे विजय देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघे निवडून आले आणि त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. नंतर सोलापूर महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपने बहुमत मिळविले. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेतही भाजपप्रणीत महाआघाडीची सत्ता आली. तसेच सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतही भाजपप्रणीत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारून निवडून आले. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा फटका बसला तरी पुढे याच अक्कलकोट नगर परिषदेत या पक्षाचे हुकमी बहुमत प्राप्त झाले. तर दुधनीसारख्या ठिकाणीही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. अशा प्रकारे जिल्ह्य़ात भाजपचे सत्ताकारण वाढले असतानाच दुर्दैवाने या पक्षात सत्तासंघर्ष वाढला आणि त्यातून उफाळून आलेल्या दोन्ही मंत्री देशमुखांतील वादाचे पडसाद सोलापूर महापालिकेसह इतरत्र अनुभवास आले. कमालीच्या वाढलेल्या या गटबाजीने इतके टोक गाठले की त्यातून पक्षाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकावर विषप्रयोग झाल्याचे प्रकरण उजेडात येऊन त्यात महापौर व पक्षाचे शहराध्यक्षासह महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची नावे संशयितांच्या पिंजऱ्यात अडकली. या प्रकरणाची चौकशी अद्यापि सुरूच आहे.

या पाश्र्वभूमीवर स्थानिक पातळीवर सत्ताधारी भाजपची प्रतिमा अतिशय खराब झाली असताना त्यात सुधारणा होण्याच्या अनुषंगाने प्रदेश पक्षश्रेष्ठींकडूनही गंभीरपणे दखल घेतली गेली नाही. उलट, हा पक्षांतर्गत मामला आहे, भांडय़ाला भांडे लागणारच, अशा शब्दात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासारख्या जबाबदार मंडळींनी  या गटबाजीकडे काणाडोळाच केला आहे. आजही ‘क्रिया-प्रतिक्रिया’ पद्धतीने दोन्ही मंत्री देशमुखांची एकमेकांच्या विरोधात गटबाजीचे ग्रहण कायम आहे. उभयतांतील शह-काटशहाच्या या राजकारणात खासदार शरद बनसोडे यांनी उडी न घेतली तरच नवल. त्यांनी पालकमंत्री विजय देशमुख यांची पाठराखण केल्यामुळे त्याची प्रतिकिया म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बनसोडे यांचा पत्ता कापून राज्यसभा खासदार अमर साबळे यांची उमेदवारी आणण्याचा आटापिटा चालविला आहे. दुसरीकडे  पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला सक्रिय केले आहे. त्यांचा जनसंपर्क इतका वाढला आहे की, त्यांनी  सकाळी फेरफटका मारताना नागरिकांशी संवाद साधण्याची संधी सोडली नाही.

विकासकामांचे लोकार्पण

सोलापुरात मोदींच्या करिष्म्यावरच स्थानिक भाजपची भिस्त आहे. योगायोगाने येत्या ९ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याचे नियोजन आखले जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्या जाहीरसभेचेही आयोजन केले जात आहे. त्यासाठी विविध चार मैदानांचा विचार होत आहे. मोदींचा हा दौरा सोलापूरच्या भाजपसाठी नवऊर्जा तथा नवसंजीवनी देणारा ठरेल, अशी रणनीती आखली जात आहे.