महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यापालांच्या या निर्णयावर भाजपा व्यतिरिक्त अन्य पक्ष टीका करत असले तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस झाले. पण कुठलाही पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये नाही. त्यापेक्षा राष्ट्रपती राजवट राज्यपालांना योग्य पर्याय वाटतो असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. पण मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याच्या मुद्दावरुन भाजपाबरोबर फिसकटल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार बनवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी संध्याकाळी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर होईल असे चित्र निर्माण झाले होते. पण काल चर्चेव्यतिरिक्त काहीच घडले नाही.

नियमानुसार राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून आधी भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. आवश्यक संख्या नसल्यामुळे भाजपाने नकार दिल्यानंतर शिवसेनेला विचारणा करण्यात आली. पण शिवसेना दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती. पण राज्यापालांनी नकार दिला. अखेरीस आज संध्याकाळपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.