भाजपबरोबरील युती अणि कमकुवत विरोधक यामुळे ८० जागांचा टप्पा सहज ओलांडता येईल, असा आत्मविश्वास शिवसेनेला होता. पण काही मतदारसंघांत भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचे गणित बिघडले. सत्तेत एकत्र असताना टोकाचा विरोध आणि शेवटच्या टप्प्यात जुळवून घेण्याची दुटप्पी भूमिकाही शिवसेनेला महागात पडली.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागा मिळवताना दुसरे स्थान व दुसऱ्या क्रमांकाची मतेही मिळवली होती. यंदा मात्र शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या ५६ जागा मिळाल्या, पण मतांची टक्केवारी घटली. ९० लाख ४९ हजार ७८९ म्हणजेच १६.४ टक्के मते मिळून शिवसेनेचा तिसरा क्रमांक लागला. तर राष्ट्रवादी १६.७ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

गेल्या निवडणुकीत भाजपने आयत्या वेळी युती तोडली तरी शिवसेनेने १५ दिवसांत स्वबळावर प्रचार करत ६३ आमदार निवडून आणले. त्यामुळे आता जन आशीर्वाद यात्रेसह विविध प्रकारे आधीपासून लोकांपर्यंत पोहोचलो आहोत आणि समोर विरोधकांमध्ये त्राण नाही, या भावनेतून अतिआत्मविश्वास आला. त्यातूनच ग्रामीण भागात शिवसेनेच्या सर्वाधिक जागा या राष्ट्रवादीच्या विरोधातील आहेत याकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात असंतोष असल्याचा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांडत होते. तो असंतोष व राष्ट्रवादीने प्रचारात मारलेली मुसंडी यामुळे अतिआत्मविश्वासात असलेल्या शिवसेनेला फटका बसला.

गेली पाच वर्षे सत्तेत एकत्र असतानाही शिवसेनेने सातत्याने भाजपला लक्ष्य केले होते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीपेक्षा टोकाचा विरोध शिवसेनेने केला होता. यामुळे शिवसेना सत्तेतही आणि विरोधातही अशा दुहेरी भूमिकेत होती. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडली, असे टोकाचे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली. तेव्हापासून शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतले. शिवसेनेला याचाही मोठा फटका बसला आहे. साडेचार वर्षे मांडीला मांडी लावून बसल्यावरही टोकाचा विरोध आणि शेवटच्या सहा महिन्यांत मैत्री ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका मतदारांना पसंत पडलेली दिसत नाही.

भाजपने मेगाभरती केल्यानंतर शिवसेनेनेही आपल्याकडेही लोक येत आहेत याचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फारसा विचार न करता भरती केली व त्यांना उमेदवारी दिल्याने हाती येऊ शकणाऱ्या जागाही शिवसेनेला गमवाव्या लागल्या.