युतीसाठी ताणून धरा, असा मंत्र शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी दिवसभरात जपला. प्रस्तावाची देणीघेणी झाली. रात्री उशिरापर्यंत दोन जागांवरून अडलेले घोडे कायम आहे. या वेळी शिवसेनेकडून प्रस्ताव गेला आहे आणि तो मान्य करायचा की नाही, हे ठरविण्यास भाजपने वेळ मागितला आहे. दरम्यान, भाजपने मंगळवारी दिवसभरात ६० वॉर्डासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
ज्या वॉर्डात ज्या पक्षाची ताकद, त्याच्यासाठी ‘अ’ श्रेणी अशी वर्गवारी करीत नव्याने बोलणी सुरू झाली. जे दोन वॉर्ड वादग्रस्त आहेत, त्यांच्याऐवजी अन्य वॉर्ड सोडण्यावरून युतीचे घोडे अडले आहे. गुलमंडीचा वॉर्ड शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला, तर राजा बाजार भाजपला देण्याचे जवळपास नक्की झाले आहे. सहा वॉर्डात अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यावरून पुन्हा बोलणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. युती होईल, असे आजही दोन्ही बाजूंनी सांगितले जात होते. शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी ताणून धरण्याचे तंत्र कायम राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
भाजप निवडणूक प्रचार कार्यालयात सकाळपासून गर्दी होती. आमदार अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर यांच्यासह प्रदेश सरचिटणीस यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारी मिळावी,  यासाठी लहान मुलांसह महिला उमेदवारांनी हजेरी लावली. प्रत्येक जण आपलीच उमेदवारी कशी योग्य, हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. ज्या वॉर्डात घर आहे, त्या वॉर्डातील व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी, अशी मागणीही केली जात होती.