विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मावळचा गोळीबार, तसेच मुंबईच्या आझाद मैदानात महिला पोलिसांची झालेली प्रतारणा हे दोन्ही प्रचाराचे मुद्दे असतील, असे संकेत भाजपकडून मंगळवारी देण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने या दोन मुद्दय़ांना हात घालून राज्यातील आघाडी सरकारवर टीका केली. गेल्या ५ दिवसांपासून सुरू असणाऱ्या आमदार पंकजा मुंडे यांच्या यात्रेला केंद्राचे पाठबळ असल्याचा संदेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाला देण्यात आला. स्मृती इराणी यांनी गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख पितृतुल्य असल्याचा करीत ही यात्रा विकास यात्रेत परिवर्तित होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सिंदखेडराजा ते चौंडी दरम्यान आयोजित पुन्हा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आमदार पंकजा मुंडे २१ जिल्ह्य़ातील ८० मतदारसंघांमध्ये प्रवास करणार आहेत. यात्रेचे प्रमुख सुजीतसिंह ठाकूर व प्रवीण घुगे आहेत. पहिल्या टप्प्याच्या समारोपात भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. सुजीतसिंह ठाकूर यांनी बीड जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावूनही गोपीनाथ मुंडे यांना थांबविणे शक्य झाले नसल्याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादी विरोधातील टीका पंकजा मुंडे यांच्याही भाषणात होती. वाक्य संपताना शेवटच्या शब्दावर जोर देत टीका करण्याची मुंडे यांची शैली जशास तशी उचलत पंकजा म्हणाल्या की, केवळ बीड जिल्ह्य़ातच नाही, तर राज्यातही प्रभाव दाखवू. ये तो सिर्फ झाँकी है. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो सावध राहा.’  सभेत बीड जि. प. चे माजी उपाध्यक्ष रमेश आडसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी यांनी राज्य सरकारवर टीका केली. गर्दी होते आहे, म्हणून पोलिसांनी काठी उगारली तरी, पंकजा मुंडे तसे न करण्याचे सुचवत होत्या. मात्र, राज्यातील मावळची घटना अजूनही आम्हाला आठवते. हातात शस्त्र नसणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या. एवढेच नाही, तर मुंबईच्या आझाद मैदानावर महिला पोलिसांची प्रतारणा होईल, असे कृत्य करणाऱ्यांनाही आघाडी सरकारने सोडून देण्याचे ठरविले. असले सरकार कसे चालेल?’ गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती जागवताना स्मृती इराणी काही वेळ गहिवरल्या.
देशातील एक रुपया जेव्हा वितरित होतो, पैकी फक्त १० पैसेच गरिबांपर्यंत पोहोचतात, असे वक्तव्य माजी पंतप्रधानांनी केले होते. सरकारचा पैसा थेट सर्वसामान्यांपर्यंत जावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जन-धन’  योजना सुरू केली आणि या योजनेत २ कोटी ४ लाखजणांचे खाते उघडण्यात आले आहेत. येत्या काळात आर्थिक व औद्योगिक क्रांती पंतप्रधान घडवून आणतील, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.