बकर ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मिरजेच्या जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी पहाटेपासूनच झुंबड उडाली होती. ईदच्या पार्श्र्वभूमीवर एका दिवसात बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात सुमारे एक कोटींची उलाढाल झाली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
बकर ईदची कुर्बानी देण्यासाठी बुधवारी मिरजेतील जनावरांचा आजचा शेवटचा बाजार होता. चांगला दर मिळेल या आशेने आजच्या बाजारासाठी कर्नाटकातील संकेश्वर, चिकोडी, अथणी, रायबाग आणि याशिवाय जत, सांगोला येथून बोकड विक्रीसाठी शेतकरी मिरजेत आले होते. पहाटेपासून जनावरांच्या बाजारात बकऱ्याची खरेदी-विक्री सुरू होती.
आजच्या बाजारात आठ हजार रुपयांपासून साठ हजार रुपयांपर्यंत बोकडाला किंमत मिळाली असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. दर आठवडय़ाच्या बाजारपेक्षा आजचा बाजार तेजीत गेला असून पाच ते साडेपाच हजार बकऱ्यांची आवक झाली होती. विक्री मात्र तीन हजारच्या आसपास झाली. आजच्या बाजारात बोकड खरेदी-विक्रीची उलाढाल एक कोटीवर गेली असून, यापासून बाजार समितीला सुमारे शेकडा आठ पसे याप्रमाणे आठ हजारांचा सेस मिळाला आहे.