बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतसा भाजपाने खासदारकीसाठी उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडील लोकसभा मतदारसंघातून कंगना निवडणूक लढवणार आहे. परंतु, उमेदवारी जाहीर झाल्यापासून कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ठाकरे गटाने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.

“भारतीय जनता पक्षाच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे किंवा ज्यांच्या अकलेने माती खाल्ली आहे, ज्यांची अक्कल माती खातेय, अशांनाच भाजपमध्ये भवितव्य आहे. कंगना रणौतने भाजपमध्ये प्रवेश करून हिमाचल प्रदेशातून लोकसभेची उमेदवारी मिळवली. कंगनाने आता प्रश्न विचारला की, सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान का केले नाही? ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले, त्यांना गायब का केले? त्यांना भारतात येण्यापासून कोणी रोखले? मुळात कंगनाचा भारतीय इतिहासाशी संबंध आला नाही. कंगनाच्या मते देश स्वतंत्र झाला, तो मोदी पंतप्रधान झाल्यावर. म्हणजे २०१४ साली. त्याआधी हा देश गुलामगिरीत होता व त्या अर्थाने कंगना वगैरे लोक हेच खरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्याबद्दल त्यांना ताम्रपट देऊन बावनकुळ्यांनी तिचा सत्कारच केला पाहिजे”, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला.

सुभाषचंद्र बोस कुठे होते?

“कंगनाला नेताजी बोस यांच्यासंदर्भात जो प्रश्न पडला आहे, त्याचे उत्तर शाळकरी पोरही देईल. बोस यांचा अपघाती मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला झाला. त्यांच्या अस्थी सप्टेंबर १९४५ ला जपानला पोहोचल्या. बोस यांचे निधन झाले तेव्हा गांधी-नेहरू, सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढा शिगेला पोहोचला होता. पण या काळात नेताजी बोस यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बोस कोठे होते? हा प्रश्न निरर्थक आहे”, अशी टीकाही करण्यात आली.

कंगनाने इतिहासाची मोडतोड करू नये

“कंगनाने ‘टाईम्स नाऊ’च्या मुलाखतीत आणखी एक अक्कल पाजळली. सरदार पटेल यांना इंग्रजी येत नसल्यानेच त्यांना पंतप्रधानपदावर बसता आले नाही. सत्य असे आहे की, सरदार पटेल हे उच्चशिक्षित होते. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. सरदार पटेल यांनी १९१३ मध्ये इंग्लंडच्या Inns of court कडून आपली कायद्याची पदवी घेतली. सरदार पटेल यांचा मृत्यू १९५० साली झाला. भारतात पहिली लोकसभा निवडणूक १९५१-५२ मध्ये झाली. त्यामुळे भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची मोडतोड करू नये. अर्थात मुंबई ही पाकव्याप्त कश्मीर असल्याची मुक्ताफळे उधळणाऱ्या कंगनाकडून शहाणपणाची काय अपेक्षा करणार?”, असा खोचक प्रश्नही विचारण्यात आला.

पंतप्रधानांच्या सहवासात कंगनासारखे लाखो ज्ञानी तयार झाले

“विश्वगुरूंकडून त्यांच्या चेल्यांना हे असे अर्धवट ज्ञान वाटले जात आहे. महाराणा प्रतापच्या चेतक घोड्याची आई गुजराती होती, असा शोध पंतप्रधान मोदी यांनी लावला. गटारात नळी टाकून गॅसनिर्मिती करता येईल असेही त्यांनी सांगितले. अलीकडच्याच एका प्रचार सभेत आपले ‘ग्यानी’ मोदीजी म्हणतात, ”अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड आया.” मोदींसाठी कोणी हवेत सिमेंटचा रस्ता बांधला काय? पण कितीही जोरदार फेकाफेकी केल्यावर टाळ्या पिटणारे व माना डोलवणारे अंधभक्त मिळाल्यावर ‘थापा’ मारण्याची नशा वाढतच जाते. गुरू व चेले त्या नशेत धुत होतात. महामारी करोनाही टाळ्या वाजवून व रस्त्यावर थाळ्या वाजवून पळून जाईल, असा सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांच्या सहवासातच कंगनासारखे लाखो ज्ञानी तयार झाले आहेत”, अशी टीका ठाकरे गटाने केली.

मोदींच्या खोट्या आश्वसानांचा धुराळा म्हणजे…

“देशातील ३ कोटी देवांचे अस्तित्व २०१४ नंतर संपले असून मोदी हेच विष्णूचे तेरावे अवतार म्हणून जन्माला आल्याचे त्यांच्या भगतगणांना वाटते व याच भगतगणांनी २०१४ नंतरचा नवा भारत निर्माण केला. त्या नव्या भारताचा इतिहास नवा आहे, पण भूगोल तोच आहे व त्या भूगोलावर सध्या रक्ताचे सडे पडले आहेत. लडाखचा भाग चीनने काबीज केला आहे. मणिपुरातील हिंसाचार थांबलेला नाही. मोदी हे रोजच खोट्या आश्वासनांचा धुरळा उडवत आहेत व तो धुरळा म्हणजे राष्ट्रीय सुगंधाची बरसात असल्याचे कंगनासारख्यांना वाटणे साहजिक आहे”, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला.

“मोदींचे वैवाहिक जीवन, मोदींची डिग्री, मोदींचे चहा विकणे, मोदींचे भीक मागून जगणे, मोदींचा भ्रष्टाचारविरोधी तथाकथित लढा, ‘न खाऊंगा न खाने दूंगा’सारख्या गर्जना, पाकव्याप्त कश्मीर पुन्हा जिंकून आणण्याच्या वल्गना, काळा पैसा नष्ट करण्याचे दाखविलेले स्वप्न हे सर्व कसे एकजात झूठ होते हे आता उघड झाले. भारतात गेल्या ७० वर्षांत काहीच घडले नाही. जे काही केले ते २०१४ नंतर मोदींनीच, असे धडे भाजपच्या नव्या व्हॉटस्अॅप विद्यापीठात दिले जातात. कंगनासारख्या विद्यार्थिनी त्याच विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या असल्याने त्यांच्या फेकाफेकीमुळे देशाची मती व बुद्धी याबाबत उगाच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. मुळात नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भाजप विचारांशी सुतराम संबंध नव्हता. भारताच्या जाज्वल्य इतिहासात संघाला स्थान नाही. भाजपचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. या न्यूनगंडाने पछाडलेले लोक आज सत्तेवर आहेत व त्याच न्यूनगंडातून ते चुकीच्या इतिहासाचे बनावट दाखले निर्माण करीत आहेत. भारताचा इतिहास म्हणजे पंतप्रधानांची बोगस डिग्री नाही व जुमलाही नाही. तूर्त इतकेच”, अशीही टीका या माध्यमातून करण्यात आली.