दोन वर्षांत केवळ ४५ टक्के काम पूर्ण 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू असून दोन वर्षांत एकूण बांधकामाच्या केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ५५ टक्के बांधकाम शिल्लक असल्याने त्याला नेमका किती कालावधी लागतो हे अनिश्चित आहे. विशेष म्हणजे, एकूण ५९८ कोटींचे हे बांधकाम आहे. त्यापैकी केवळ २३० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात निधीसाठी बांधकाम रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या जिल्हय़ात २०१५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सुरुवात झाली. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली गेली. वैद्यक महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने रामनगर परिसरातील महिला रुग्णालयाचे इमारतीत महाविद्यालय सुरू झाले. आज महाविद्यालय सुरू होऊन सहा वर्षे पूर्ण झाली असली तरी वैद्यक महाविद्यालयाचे इमारतीचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. अगदी सुरुवातीला तर महाविद्यालयाचे जागेवरून येथे बराच वाद झाला. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दाताळा मार्गावरील जागा वैद्यक महाविद्यालयासाठी योग्य राहील असे सुचवले तर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बायपास मार्गावरील पागलबाबा नगर येथील जागा निश्चित केली. या जागेवरून बराच घोळ  झाला. शेवटी पागलबाबा नगरची जागा निश्चित झाली.

मदतीचे आश्वासन

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती. तेव्हाच त्यांनी या महाविद्यालयाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगितले होते. त्यांच्यासोबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही पाहणी करून वैद्यक महाविद्यालयाच्या बांधकामाची गती वाढवण्यास सांगितले होते. परंतु आजही महाविद्यालयाचे बांधकाम अतिशय संथ सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

निधीची अडचण?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम हे १०० एकरवर होत असून या प्रकल्पाला मे २०१९ रोजी सुरुवात झाली. मात्र महाविद्यालयाचे बांधकाम इतक्या संथ गतीने सुरू आहे की आतापर्यंत एकूण बांधकामाच्या केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच मुख्य रुग्णालयाच्या इमारतीचे ३५ टक्के बांधकाम पूर्ण झाले, निवासी वसाहत टाईप-२ आणि ३ चे ८८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे, वसतिगृहाचे ७९ टक्के बांधकाम, मुलींच्या वसतिगृहाचे ६९ टक्के बांधकाम, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचे ६८ टक्के, लायब्ररी व प्रशासकीय इमारतीचे ६१ टक्के, वैद्यकीय प्रयोगशाळेचे ४८ टक्के बांधकाम, इतर कार्यालयांचे ५८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. करोना संक्रमणकाळात वैद्यक महाविद्यालयाचे कामावरील जवळपास एक हजार मजूर निघून गेल्याने त्याचाही फटका या कामाला बसला आहे. दोन वर्षांत केवळ ४५ टक्केच बांधकाम पूर्ण करता आल्याने उर्वरित ५५ टक्के बांधकामाला आणखी किती कालावधी लागेल हे निश्चित नाही. निधीची अडचण येथे निर्माण होणार आहे. ५९८ कोटीचे हे बांधकाम असले तरी प्रत्यक्षात आजवर केवळ २३० कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आगामी काळात निधी ही सर्वात मोठी समस्या राहणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना निधीचा प्रश्न नव्हता तसेच बांधकामाच्या कामाची गतीही अधिक होती. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. त्याला सर्वात मोठे कारण करोना संक्रमण आहे. मागील एक ते दीड वर्षांत राज्य शासनाचा सर्वाधिक निधी हा करोना उपाययोजनांवर खर्च झालेला आहे. त्यामुळे वैद्यक महाविद्यालयाचे काम सुस्तावले आहे अशीही एक चर्चा आहे. त्यातच महिला महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व वन अकादमी या तीन ठिकाणी करोना रुग्णालय सुरू करण्यात आले तसेच तालुकास्तरावरही करोना रुग्णालय सुरू केले गेले. त्यामुळे बहुतांश निधी तिथे खर्च झाल्यानेही वैद्यक महाविद्यालयाचे काम मागे पडले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very slow construction of chandrapur government medical college and hospital zws
Show comments