पुढाऱ्यांच्या मागे फिरून कोणीही नेता होत नाही. नेता होण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. स्वतःला सिद्ध करावे लागते त्यामुळे पुढाऱ्यांच्या मागे फिरणे सोडा, कारण त्या पुढाऱ्यांच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचवेळी तरूण कार्यकर्त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सल्ला दिला.

जनतेची कामे करण्यासाठी युवक काँग्रेस हे मोठे व्यासपीठ आहे. पक्षाकडून काही कार्यक्रम नसेल तर राजीव गांधी आरोग्यदायी योजना तसेच इतर योजना राबवा. लोकांमध्ये मिसळून काम करा. आरोग्याचा प्रश्न मोठा आहे, सरकारने जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही ते पाहण्याची जबाबदारी आपली आहे असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. जनतेच्या कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. मतदारसंघात किती काम केलेत हे आता पाहिले जाणार आहे त्यामुळे ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. त्याचमुळे उत्साहाने कामाला लागा असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

युवक संघटनेतून विविध पदांवर काम केल्यावर आपल्याला काँग्रेस पक्षात चांगली संधी मिळाली असे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. आज मी जो काही आहे तो काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामाच्या जोरावर असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. तर सध्याचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमकपणे काम करत नसल्याचे राजू वाघमारे यांनी म्हटले आहे.