सडा मारण्यासाठीच्या रंगाचा वापर केल्याने चिंता
कामावरून कमी केल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका यंत्रमाग कामगाराने मोर छाप विषारी पिवळा रंग प्राशन करून आत्महत्या केली. शहरानजीक कुंभारी येथे स्वामी समर्थ विडी घरकुलात हा प्रकार घडला. घरासमोर अंगणात सडा मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या विषारी पिवळ्या रंगाचा वापर आता आत्महत्येसाठी होऊ लागल्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे.
अशोक कृष्णाहरी बोडा (५०) असे आत्महत्या केलेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. शहरातील विडी व यंत्रमाग उद्योग अलीकडे प्रतिकूल परिस्थितीत असून विशेषत: विडी उद्योग मोठय़ा संकटात आहे. गेल्या एप्रिल महिन्यात विडी कारखानदारांनी विडी उत्पादन थांबविले होते. केंद्र सरकारच्या धूम्रपानविरोधी कायद्यातील जाचक अटीमुळे विडी उद्योग चालविणे अशक्य झाले आहे. त्यातून निर्माण झालेल्या बेकारीच्या संकटामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, या चिंतेने तीन महिला विडी कामगारांनी आत्महत्या केली होती. आता यंत्रमाग उद्योगातही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशोक बोडा हे एका यंत्रमाग कारखान्यात काम करीत होते. आपल्या आजारी सासूला भेटण्यासाठी ते पुण्याला गेले होते. पाच दिवसांनी ते सोलापुरात परतले. परंतु यंत्रमाग कारखान्यात कामावर हजर झाले असता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे मानसिक धक्का बसल्याने त्यांनी विषारी रसायन प्राशन करून आत्महत्येचा मार्ग पत्करला.
शहराच्या पूर्व भागात गल्लीबोळात किराणा मालाच्या दुकानात मोर छाप पिवळ्या रंगाची पुडी केवळ तीन रुपयात मिळते. घरासमोर अंगणात शेणाचा सडा मारला जातो, त्याप्रमाणे शेणाऐवजी पिवळ्या रंगाचा वापर अंगणात सडा मारण्यासाठी केला जातो. या पिवळ्या रंगाच्या वापरामुळे अंगणात शेणाचाच सडा मारल्यासारखा भास होतो. परंतु हा रंग विषारी असून खाण्यास अपायकारक आणि जीवघेणा असतो. तसा वैधानिक इशारा रंगाच्या पाकिटावर असतो. परंतु या रंगाचा वापर आता घरासमोर अंगणात सडा मारण्याऐवजी आत्महत्या करण्यासाठी होऊ लागल्याचे दिसून येते.

नऊ पोती पिवळा रंग जप्त
दरम्यान, गल्लीबोळात सहजपणे ते देखील अवघ्या तीन रुपयांत मिळणाऱ्या मोर छाप पिवळ्या रंगाचा वापर आत्महत्येसाठी होऊ लागल्याचे प्रकार घडू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर अखेर अन्न व औषध प्रशासन विभागाने दोघा विक्रेत्यांवर कारवाई करून नऊ पोती पिवळा रंग जप्त केला आहे. गणेश पेठेतील सुहास कलर्स ट्रेडर्स आणि भुसार गल्लीतील योगीनाथ कुणी यांच्या सिद्धेश्वर ट्रेडर्स या दुकानात ही कारवाई करण्यात आली. मोर छाप पिवळा रंगाचा साठा जप्त केल्यानंतर या दोन्ही व्यापाऱ्यांना सीआरपीसी कलम १४९ प्रमाणे नोटीसही बजावण्यात आली आहे.