वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेले द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शनिशिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथऱयावर महिलांना प्रवेश देण्याच्या पार्श्वभूमीवर शनीची दृष्टी महिलांवर पडल्यास बलात्काराच्या घटना वाढतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. काही वृत्तवाहिन्यांवर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. शंकराचार्यांनी साईबाबा भक्तांचा रोष ओढवून घेणारे वक्तव्यही केले आहे. साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
साईबाबांची पूजा अनुचित असून, त्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. जिथे जिथे अनुचित व्यक्तींची पूजा करणारा समाज असतो. तिथे दुष्काळ पडतो किंवा पूर येतो, नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांचा जीव जातो, अशा घटना वारंवार घडतात. महाराष्ट्रातही या घटना घडत आहेत, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे. कोणत्याही हिंदूने साईबाबांची पूजा करू नये. घरातून आणि मंदिरातून साईबाबांचे छायाचित्र आणि मूर्ती काढून टाकण्यात यावी, असेही त्यांनी सूचविले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे साईबाबा भक्तांच्या भावना दुखावण्याची शक्यता असून, त्याचे पडसाद राज्यात उमटू शकतात.
शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱयावर महिलांनी प्रवेश केल्याबद्दलही शंकराचार्यांनी नाराजी व्यक्त केली. चौथऱयावर महिलांनी प्रवेश करू नये. नाहीतर त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी सांगितले.