मराठी चित्रपटसृष्टीतील ‘सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरत जाधवची परवानगी न घेताच चित्रपट प्रदर्शित करून त्याची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. भरत जाधवसारख्या ताऱ्याला फसवणारे निर्माते होते सदाशिव पाटील आणि त्यासाठी रचलेले जाळे म्हणजे ‘शिवाजी – द रियल हिरो’ हा काही महिन्यांपूर्वी झळकलेला चित्रपट!
मराठी चित्रपट महामंडळाच्या नियमावलीनुसार कलाकार व तंत्रज्ञांचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करता येत नाही. मात्र ‘शिवाजी – द रियल हिरो’ या चित्रपटाच्या बाबतीत भरतकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. चित्रपट बनवताना चित्रपटात माझी प्रमुख भूमिका असेल, असे सांगण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच चित्रपट आपल्याभोवती नाही, तर सिद्धार्थ जाजूभोवती फिरत असल्याचे आपल्या लक्षात आले. हा चित्रपट ‘सबकुछ सिद्धार्थ जाजू’ होता. तरीही चित्रपट अडू नये, यासाठी आपण चित्रीकरण थांबवले नाही, असे भरतने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
काही दिवसांनी निर्मात्याने चित्रीकरण थांबवले. पैशांची अडचण आल्यामुळे चित्रिकरण थांबवण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही दिवसांतच ‘डबिंग’साठी कधी येत आहात, असा फोन आला. मात्र आपले महत्त्वाचे चार सीन्स अद्याप चित्रीत न झाल्याने आधी ते सीन्स चित्रीत करा, मग डबिंग करतो, असे आपण त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी काहीच संपर्क साधला नाही, असे भरत म्हणाला. मात्र हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी झळकल्याची बातमी आपल्याला तीनच दिवसांपूर्वी मिळाल्याचे त्याने सांगितले.
याबाबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांना विचारले असता, असा प्रकार घडला असेल, तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित चित्रपट महामंडळाकडेच मंजुरीसाठी आला होता का, हे तपासून आपण याबाबत कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटातील प्रमुख भूमिका करणाऱ्या आणि चित्रपटाचा ‘घोस्ट प्रोडय़ुसर’ असलेल्या सिद्धार्थ जाजूशी संपर्क  होऊ शकला नाही.

धनादेशही वटले नाहीत!
निर्मात्याने आपल्याला सुरुवातीला दोन धनादेश दिले होते. मात्र हे धनादेशही वटले नाहीत. त्यानंतर आपण त्यांच्याकडे पैशांबाबत मागणी केली असता, त्यांनी काही फुटकळ रक्कम टेकवली. मात्र त्यानंतर निर्मात्यांनी ना माझे चार सीन्स चित्रीत केले, ना मला पैसे दिले. उलट त्यांनी भलत्याच्याच आवाजात माझ्या भूमिकेचे ‘डबिंग’ केले. ही शुद्ध फसवणूक आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अशा निर्मात्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे.     भरत जाधव

महामंडळाचा नंबर सेव्ह करायला हरकत नाही
दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबाबत आता वाद होणे दुर्दैवी आहे. यात निर्मात्यांना धडा शिकवायलाच हवा. पण माझ्या मते कलाकारांनीही महामंडळाशी असलेली बांधिलकी जपली पाहिजे. अनेकदा महामंडळातून ना हरकतीसाठी येणारा फोन कलाकार उचलत नाहीत. अशा वेळी आमचाही नाईलाज असतो. कलाकारांनी आपल्या मोबाइलमध्ये महामंडळाचे दोन नंबर सेव्ह करायला हरकत नाही. त्यामुळे आमचे नाते दृढ होईल आणि अशा समस्या टळतील.
प्रसाद सुर्वे, अध्यक्ष  (चित्रपट महामंडळ)