गोविंदा एकेकाळचा बॉलिवूडमधला सुपरस्टार मानला जायचा. गोविंदाचे चित्रपट म्हणजे हिट होणारचं असं हे समिकरणचं बॉलिवूडमध्ये त्याकाळी ठरलं होतं. मात्र आता गोविंदा बॉलिवूडच्या शर्यतीत कधीच मागे पडला काही दिवसांपूर्वी त्याचा ‘रंगीला राजा’ चित्रपटही प्रदर्शित झाला. मात्र प्रेक्षक या चित्रपटाकडे फिरकलेही नाही. पण चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पहलाज निलहानी यांनी ‘रंगीला राजा’च्या अपयशाचं खापर बॉलिवूडमधल्या ‘ग्लॅमरस माफियां’वर फोडलं आहे.

‘गोविंदा आणि माझे बॉलिवूडमध्ये कित्येक शत्रू आहेत. आमचं करिअर संपवण्याचा त्यांचा डाव आहे’, असं आरोप पहलाज निलहानी यांनी केला आहे. ‘हे क्षेत्र सध्या ‘ग्लॅमरस माफियां’द्वारे चालवलं जातं. हे सर्व जण एकत्र राहतात, जेवतात, झोपतात आणि चित्रपटही एकत्रच करतात. बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलाकरांवर त्यांची मदार आहे. मी सेन्सॉर बोर्डचा अध्यक्ष होतो म्हणून त्याचा रागही माझ्यावर काढला जात आहे. काही लोक माझा द्वेष करतात आणि यामुळेच गोविंदाचाही ते द्वेष करू लागले आहेत. आम्हा दोघांनाही संपवण्याचा त्यांचा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. गोविंदा हा आजही सुपरस्टार आहे आणि त्याला घेऊन मी पुढेही चित्रपट काढेल’ असंही निलहानी म्हणाले.

गोविंदा आणि माझं करिअर संपवण्यासाठी ‘रंगीला राजा’ला अनेक ठिकाणी चित्रपटगृह दिलं नाही असाही निलहानी यांचा आरोप आहे. १८ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला राजा’ नं पहिल्या आठवड्यात जेमतेम १५ ते १८ लाखांचा गल्ला जमवला होता.