रेश्मा राईकवार

हेलबॉय

नरकातून आलेल्या हुशार आणि तितक्याच सहृदयी प्राध्यापकाच्या प्रेमळ सहवासात मोठा झालेला विचित्र दिसणारा, असामान्य शक्ती असलेला हेलबॉय ही अफलातून मिश्रण असलेली व्यक्तिरेखा २००४ साली पडद्यावर आली होती. गिलियारमो डेल तोरो दिग्दर्शित लालेलाल रंगाचा, दोन शिंगे असलेला, राकट चेहरा आणि एक दगडी हात असलेला अवाढव्य पण स्वभावाने बालिश असा हेलबॉय प्रेक्षकांना आवडला. कॉमिक बुकमधला असामान्य शक्ती लाभलेला हा विचित्र तपास अधिकारी रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरला. त्यामुळे २००८ मध्ये पुन्हा एकदा ‘हेलबॉय २ – द गोल्डन आर्मी’ हा सिक्वलपट प्रदर्शित झाला. तोही यशस्वी ठरला. आणि आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा हेलबॉय प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या चित्रपटात जुनीच कथा नव्याने मांडण्याचा प्रयत्न अर्थात ‘रिबूट’ म्हणून हेलबॉय परत आला आहे, मात्र तो आला नसता तर बरे इतक्या वाईट पद्धतीने या लोकप्रिय हिरोच्या कथेची वासलात लावली आहे.

हेलबॉयच्या तिसऱ्या सिक्वलची गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती. या चित्रपट मालिकेचा दिग्दर्शक गिलियारमो डेल तारो आणि हेलबॉय साकारणारा अभिनेता रॉन पर्लमन या दोघांनीही सुचवलेल्या कथा अमान्य झाल्या. अखेर हा चित्रपट रिबूट करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आणि ही दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडगोळी त्यातून बाहेर गेली. आता प्रदर्शित झालेल्या हेलबॉयचे वरवरचे रूपडे सारखे असले तरी मूळ चित्रपटाचा आत्माच हरवला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन नील मार्शल याने केले आहे, तर हेलबॉयची भूमिका अभिनेता डेव्हिड हार्बर याने केली आहे. मुळात १० वर्षांनंतर आलेल्या या चित्रपटात पुन्हा हेलबॉयच्या जन्मापासूनची कथा पाहावी लागते. अर्थात तीही पाहण्याची तयारी प्रेक्षकांनी दाखवली असती, मात्र ही कथा दाखवण्यामागे दिग्दर्शकाचा नेमका उद्देश काय हेच कुठे स्पष्ट होत नाही. कथा नव्याने मांडताना हेलबॉयचा जन्म आणि सध्या तो करत असलेले काम, त्याच्यावरची जबाबदारी, त्याचा नेमका शत्रू कोण यातले काहीच लक्षात येऊ नये अशा पद्धतीने दिग्दर्शकाने गोष्टींवर गोष्टी रचल्या आहेत. यातून त्याला काय सांगायचे होते याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. त्यामुळे चित्रविचित्र आकाराचे, माणसांना खात सुटणारे मोठमोठे, कुरूप राक्षस एकामागून एक येत राहतात. हेलबॉय त्यांना मारत राहतो.

मध्येच कुठेतरी निमूय नावाच्या दुष्ट शक्तीची कथा सुरू होते. ती जिवंत झाली तर धरतीचा विनाश निश्चित आहे, म्हणून हेलबॉयचे वडील आणि बीआरडीपीचे (ब्युरो ऑफ पॅरानॉर्मल रिसर्च अ‍ॅण्ड डिफेन्स) प्रमुख प्राध्यापक ब्रूम त्याला निमूयला थांबवण्यासाठी पाठवतात. यादरम्यानच्या काळात हेलबॉयची भेट अ‍ॅलिसशी होते. कधीकाळी त्याने तिचा जीव वाचवला होता. आत्म्यांचे मन वाचू शकणारी अ‍ॅलिस आणि तपास अधिकारी मेजर बेन हे दोन सहकारी हेलबॉयच्या ताफ्यात दाखल होतात आणि मग निमूयची कथा पुन्हा सुरू होते, म्हणण्यापेक्षा चित्रपटाच्या सुरुवातीपासून छळणारी ब्लड क्वीन नावाची भयानक बाई काही सेकंदांतच नष्ट होते. याही प्रक्रियेत हेलबॉयच्या जन्माच्या दोन कथा सांगून होतात. हा कथेतलाच गोंधळ इतका थकवणारा आहे की या सगळ्यातून काहीच हाती लागत नाही.

हेलबॉयचे आधीचे दोन्ही भाग मांडताना दिग्दर्शकाने त्याच्या स्वभावातील आक्रमकपणा आणि हळवेपणा याची अचूक सांगड घालत भावनाप्रधान कथा मांडली होती. मात्र हेलबॉयचा हा आत्माच दिग्दर्शक नील मार्शलला गवसलेला नाही. संपूर्ण चित्रपटभर अतिशय भडक, हिंसक आणि कि ळसवाण्या पद्धतीचे चित्रण करण्यात आले आहे. संपूर्ण चित्रपट पाहताना इतकी नकारात्मक भावना मनात घर करून राहते की, जणू या जगात राक्षसांशिवाय काही उरलेलेच नसावे. मानवी संवेदनांचा कुठल्याही प्रकारे विचार या चित्रपटात केलेला जाणवत नाही. गोष्ट सांगण्याची दिग्दर्शकाची घाईच इतकी मोठी आहे की, या चित्रपटाचा नायक आणि त्याचे मानलेले वडील जे या कथेचे मुख्य सूत्रधार आहेत त्यांचे नातेही नीट मांडण्याची तसदी दिग्दर्शकाने घेतलेली नाही.

एक ना धड व्यक्तिरेखा आणि भाराभर गोष्टींच्या चिंध्या अशा स्वरूपात आलेला हेलबॉय बघितल्यानंतर जुन्याचीच सय मनात दाटते. डेव्हिड हार्बर या अभिनेत्याने प्रयत्नपूर्वक हेलबॉय साकारला असला तरी रॉनच्या हेलबॉयची सर त्याला नाही. इतर कलाकार त्या त्या भूमिकांमध्ये व्यवस्थित बसले आहेत, पण त्या अर्थाने कोणाचाच प्रभाव पडत नाही. भरीस भर म्हणून चित्रपटाच्या सिक्वलचेही सूतोवाच करण्यात आले असल्याने आणखी हाल नकोत.. असेच सांगावेसे वाटते.

* दिग्दर्शक – नील मार्शल

* कलाकार – डेव्हिड हार्बर, मिला जोवोविच, साशा लेन, इयान मकशेन.