एक काळ नायिका म्हणून हरएक भूमिका मग ती तद्दन मसाला चित्रपटातून असेल किंवा आशयघन चित्रपटातून असेल बाखूबी निभावणारी सुंदर अभिनेत्री म्हणून मनीषा कोईरालाचा नावलौकिक होता. आजही तिचा लौकिक कायम असला तरी दरम्यानच्या काळात चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांनंतर त्याच्याशी स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न तिने केला नाही. ती रुपेरी पडद्यापासून लांब गेली. त्यातच कर्करोगासारख्या आजाराचा सामना तिला करावा लागला. त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडलेली आजची मनीषा कोईराला मात्र वेगळी भासते. पहिल्यापेक्षाही तिचा आत्मविश्वास अजून वाढला असून सध्या तिचे चित्रपट आणि भूमिका यामुळे ती चर्चेत आहे. आजारपणात एक क्षण होता जेव्हा आपण सगळंच गमावून बसणार ही भीती विळखा घालून बसली होती. त्या भीतीनेच आयुष्य आहे तसं पाहायला, त्याचं कौतुक करायला शिकवलं, असं ती म्हणते.

‘नेटफ्लिक्स’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चार लघुपटांपैकी दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित लघुपटात मनीषाने काम केले आहे. ती या लघुपटात अंमळ सुंदर दिसली आहे. या लघुपटातील तिच्या अभिनयाबद्दल सगळीकडे कौतुक सुरू असतानाच या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटात ती संजय दत्तची आई अभिनेत्री नर्गिस यांच्या भूमिकेत दिसणार आहे. योगायोग म्हणजे एकीकडे या चित्रपटात ती संजयच्या आईची भूमिका करते आहे तर दुसरीकडे ‘प्रस्थानम’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ती संजय दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘संजू’ या राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपटात ती नर्गिस यांची भूमिका करते आहे. खरं म्हणजे या भूमिकेसाठी आपली तयारी नव्हती, असं तिने स्पष्ट केलं. आईची भूमिका एकदा केली की तुमच्यावर तोच ठप्पा लागतो. तुम्हाला आईच्याच भूमिकांसाठी विचारणा केली जाते. मलाही त्या प्रतिमेत अडकून पडण्याची भीती वाटत होती त्यामुळे पहिल्यांदा मी या भूमिकेसाठी तयारच नव्हते, असं ती म्हणते. मात्र इथे केवळ संजय दत्तची आई म्हणून नाही तर अभिनेत्री नर्गिस यांची भूमिका आहे हेही तिने लक्षात घेतलं. या भूमिकेचं सगळं श्रेय मनीषा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना देते. नर्गिस यांच्या भूमिकेसाठी मला खूप साऱ्या लुक टेस्ट्समधून जावं लागलं, पण हिरानी यांचा मूळ अभ्यासच इतका पक्का होता की त्यामुळे फारशी अडचण आली नाही, असं सांगतानाच चांगला दिग्दर्शक, टीम यांच्याबरोबर काम करण्याचा तोच फायदा असतो असंही ती म्हणाली.

‘माझा दिग्दर्शक आणि टीम दोन्ही इतकं चांगलं होतं की, अर्धी लढाई तर मी तिथेच जिंकले असं म्हणेन. तुमचा दिग्दर्शक चांगला असेल तर कुठल्याही भूमिकेसाठी लागणारं मूलभूत संशोधन, तयारी त्यांनी पक्की केलेली असते. त्यामुळे मग कलाकाराला ती व्यक्तिरेखा साकारणं तितकं जड जात नाही. इथेही माझ्या लुक टेस्ट जास्त झाल्या, पण या भूमिकेतून काय हवंय हे त्यांना पक्कं माहिती होतं. याशिवाय, आम्ही पुस्तकं वाचली, नर्गिस यांच्याशी संबंधित लघुपट पाहिले. सगळ्या तयारीनिशी मला जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल तितक्या प्रयत्नपूर्वक मी ही भूमिका केली आहे,’ असं ती म्हणते. सध्या ‘लस्ट स्टोरी’ या चित्रपटाबद्दल तिला सगळीकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळतायेत, त्याबद्दलही ती एकदम खूष आहे. तुमच्या कामाबद्दल जेव्हा लोकांकडून तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात तेव्हा खूप उत्साह येतो. तुम्हाला तुमच्या कामाची खात्री पटते, असं ऐंशीच्या वर चित्रपट केलेली ही अभिनेत्री सांगते तेव्हा नवल वाटल्याशिवाय राहत नाही.

‘लस्ट स्टोरी’ कथा तिलाही खूप आवडली होती. मी ‘बॉम्बे टॉकीज’मधली दिबाकर बॅनर्जीचा एक लघुपट पाहिला होता. मला तो खूप आवडला आणि तेव्हापासून त्याच्याबरोबर काम करायची इच्छा होती. ती या ‘लस्ट स्टोरी’च्या निमित्ताने पूर्ण झाली, असं ती म्हणते. मात्र दिबाकरने ज्या पद्धतीने ही कथा हाताळली त्यापेक्षा ती वेगळ्या पद्धतीने करता आली असती. माझी ती खूप इच्छा होती मात्र शेवटी हा त्याचा चित्रपट होता. अंतिमत: पडद्यावर ती गोष्ट लोकांना नक्कीच आवडली, मात्र मी त्याबाबतीत समाधानी नव्हते, असंही ती मोकळेपणाने कबूल करते.

सध्या करिअरच्या ज्या टप्प्यावर ती आहे त्याबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल खूप समाधानी आणि आनंदी असल्याचं तिने सांगितलं.

पहिल्यापेक्षा मी आता जास्त ध्येयकेंद्रित आहे, विश्वासाने काम करते आहे, असंही ती म्हणते. मात्र बॉलीवूडच्या लेखक-दिग्दर्शकांकडून तिला खूप अपेक्षा आहेत. आपल्याकडे अजूनही तरुण असण्याचं, सुंदर दिसण्याचं माहात्म्य जास्त आहे. त्यामुळे आपल्या जवळपास सगळ्याच चित्रपटांतील कथा या तरुणांभोवतीच फिरतात. ३० ते ४० या वयोगटापलीकडे आयुष्यच संपतं का, असा प्रश्न ती विचारते.

खरंतर, माणसाचं आयुष्य इतकं मोठं आहे म्हटल्यावर त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतील गोष्टी लोकांसमोर यायला हव्यात. मात्र आपल्या चित्रपटांमधून तसं होत नाही. चाळिशी उलटली की आईच्या भूमिकेपलीकडे भूमिकाच लिहिल्या जात नाही, असं सांगतानाच या  संकुचित दृष्टिकोनामुळे आज आपण प्रत्येक जण सुंदर दिसण्याच्या ताणाखाली जगतो आहोत, अशी खंत तिने व्यक्त केली. कलाकारांवर कोणत्याही वयात सुंदर दिसण्याचा ताण इतका जास्त आहे की तो एकाक्षणी असह्य़ होता. या ताणाखाली येऊन अनेक कलाकार सुंदर दिसण्यासाठी, राहण्यासाठी आटापिटा करतात. आपल्या प्रकृ तीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांचं नुकसान जास्त होतं. मी आपल्या दिग्दर्शकांना-लेखकांना आवाहन करेन की त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी लिहायला हव्यात, लोकांसमोर आणायला हव्यात. कलाकारांनाही काम करावंसं वाटायला हवं. मात्र काहीही झालं तरी आपल्या तब्येतीक डे, मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करायचं नाही हे स्वत:च्या मनाशी पक्कं केलं असल्याचं मनीषा आवर्जून सांगते. आजारपणाला जिंकल्यानंतरचं तिचं हे पुनरागमन तिच्या चाहत्यांसाठी सध्या उत्साहाचं ठरलं आहे. तिच्या वाटय़ाला चांगल्या भूमिका आल्या असल्याने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाची जादू अनुभवायला मिळेल, असा विश्वास तिच्या चाहत्यांनाही वाटू लागला आहे.

आजारपण आल्यानंतर आपण किती गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आहोत, किती गोष्टी आपण गमावल्या आहेत, याची प्रचीती आली. खरंतर आता आयुष्य संपणार, आपण सगळंच गमावून बसणार या भीतीतून येणारा प्रत्येक क्षण अनुभवायला, त्याचा आदर करायला मी शिकले. आता कितीतरी साध्या साध्या गोष्टी मी आवर्जून करते. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा वरदान आहे. मी आवर्जून सूर्योदय बघते, अनवाणी पायाने हिरव्यागार मऊ गवतातून चालायला मला आवडतं, आकाशात दिसणारे तारे, तुमच्या चेहऱ्यावर येणारी वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ ही प्रत्येक गोष्ट अनुभवायला हवी. ही प्रत्येक गोष्ट मला मी जिवंत आहे, याचा आनंद देऊन जाते. केवळ आयुष्याचीच नाही तर करिअरची घडीही आत्ता जास्त चांगल्या पद्धतीने बसली आहे.

मनीषा कोईराला