21 January 2021

News Flash

मध्यमवर्गीय घरातील संस्कार आणि शिस्तीचा फायदा

विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत दामले यांनी दिलखुलास गप्पांची मैफल रंगविली.

विद्याधर कुलकर्णी

‘संगीत रंगभूमीचा पडता काळ घरातील लोकांनी जवळून पाहिला असल्याने मी नाटकामध्ये जाऊ नये असेच घरच्यांचे मत होते. नाटकात जाणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे अशी स्वच्छ भूमिका होती. पण माझ्या गाण्याला घरच्यांचा विरोध नव्हता. मध्यमवर्गीय घरातील संस्कार आणि शिस्तीचा माझ्या नाटय़ कारकीर्दीला फायदा झाला’, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. घर शांत असेल तर आपल्याला हवे ते करता येते. त्यामुळे आपले छंद जोपासताना आई-वडिलांचे ऐकले पाहिजे, असा सल्ला त्यांनी कला क्षेत्रातील नवोदितांना दिला. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांनी प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत दामले यांनी दिलखुलास गप्पांची मैफल रंगविली.

दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये माझे बालपण गेले. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. दिवाळीमध्ये किल्ला करायचो. मध्यमवर्गीय घरात दिवाळीला एकदाच नवीन कपडे आणि शाळा सुरू होताना दोन गणवेश घेतले जायचे. शिवाजी मंदिरला नाटकाचा प्रयोग पाहणे ही चैन असायची. आम्ही घरातील चौघांनी शिवाजी मंदिर येथे वसंतरावांचे ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक पाहिले होते. जाण्यापूर्वी नाटक कसे असेल, याची चर्चा आणि घरी परतताना नाटक कसे होते याची चर्चा केली होती, अशा आठवणींना दामले यांनी उजाळा दिला.

कला क्षेत्रात काम करताना समोरच्याकडून झालेला अपमान की आव्हान हे आपण ठरवायचे. आव्हान म्हणून पाहिले तरच आपण काम करू शकतो, असा सल्ला दामले यांनी नवोदितांना दिला. ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम मी आव्हान म्हणूनच केला, असेही त्यांनी सांगितले. गरजवंत कलाकारांना पर्याय नसतो. मला चित्रपट मिळाले तेव्हा ते ‘धूमधडाका’ किंवा ‘अशी ही बनवाबनवी’प्रमाणे यशस्वी झाले नाहीत. ‘गेला माधव कुणीकडे’नंतर चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या तरी मी चित्रपटांमध्ये रमलो नसतो, असे दामले यांनी सांगितले.

नाटकामध्ये पडद्यामागचा कलाकार म्हणून हौसेने खूप काम केले. १९७८ ते १९८२ या काळात मी मॉबमध्येच असायचो. त्यामुळे मुख्य कलाकाराबद्दल काय आणि कसे बोलले जाते हे समजले. मी नट झाल्यानंतर काय करायचे नाही हे यामुळे ध्यानात आले. ‘टूरटूर’ हे माझे पहिले व्यावसायिक नाटक. विजय केंकरे यांनी माझे नाव पुरुषोत्तम बेर्डे यांना सुचविले होते. त्या नाटकामध्ये माझ्या भूमिकेला फक्त दोन वाक्ये होती. चांगले नाटक आणि यशस्वी नाटक यात फरक असतो. चांगले नाटक नेहमीच यशस्वी ठरते असे  नाही, असे सांगत ज्या नाटकांना हाऊसफु ल्ल बुकिं ग मिळते ते यशस्वी अशीच सर्वसाधारण व्याख्या आहे, असे त्यांनी सांगितले. ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे पहिले १८२ प्रयोग सुधीर भट यांनी तोटय़ामध्ये चालविले. त्यानंतर ८५० प्रयोगांपर्यंत कायम ‘हाऊसफुल्ल’चा फलक कधी हटला नाही. ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदा ‘आणि प्रशांत दामले’ हे फलकावर लागले. दिवसा ‘ब्रह्मचारी’ नाटकाची रंगीत तालीम आणि संध्याकाळी ‘मोरूची मावशी’चे प्रयोग करताना ओढाताण झाली असली तरी त्याचाही आनंद लुटला. सुधीर भट आणि अशोक पत्की यांनी माझा गळा गाता ठेवला, अशा शब्दांत दामले यांनी आपला रंगभूमीवरचा प्रवास मांडला.

नाटकांमध्ये २३ वर्षे काम केल्यानंतर साचलेपण येते. नवी आव्हाने घ्यावी असे वाटल्याने निर्माता झालो. ‘ओळख ना पाळख’ या नाटकाचे ऑनलाइन बुकिंग ही संकल्पना राबविली. नव्या कलाकारांना घडविण्यासाठी टी-स्कूल सुरू केले. प्रमाण भाषा शिकवली गेली तर कलाकार वेगवेगळ्या प्रदेशाची भाषा बोलू शक तील. स्वच्छ बोलणे, हातवारे कसे करायचे, शब्दांचा सूर कसा पकडायचा हे मी मुलांना शिकवतो. वाक्याला ताल आणि सम असते. तो ताल आणि ती सम कशी पकडायची हे मी मुलांना सांगतो, असेही दामले यांनी सांगितले. शारीरिक ताण घालविण्यासाठी प्राणायाम आणि सूर्यनमस्कार हा व्यायाम करतो. रात्री झोपी जाताना दिवसभरातील गोष्टींचे पान उलटून टाकतो. नवीन दिवसाच्या नवीन गोष्टी माझी वाट पाहात असतात. त्यामुळे मानसिक ताण कधीच येत नाही, अशा शब्दांत प्रशांत दामले यांनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य सांगितले.

टाळेबंदीच्या वेळेचा सदुपयोग

डिसेंबर १९८५ नंतर माझ्या आजारपणाच्या वेळी एक महिन्याचा अपवाद वगळला तर टाळेबंदीमुळे प्रथमच एवढी मोठी सुट्टी मिळाली. आराम करता येईल म्हणून सुरुवातीला छान वाटले. यानिमित्ताने जागेपणी स्वत:चे घर पाहता आले. कागदपत्रे नीट लावून झाली. या जबरदस्तीच्या सुट्टीत भरपूर वाचन केले. नव्या नाटकाच्या संहितांचे वाचन केले. या वेळेचा सदुपयोग केला, असे दामले यांनी सांगितले. घरखर्च किती कमी आहे याची जाणीव झाली. आपण सतत पळत असतो खरे, पण गरजा किती कमी आहेत हे ध्यानात आले. कॅनडा आणि शिकागो येथील ४० मुलांना ऑनलाइन माध्यमातून शिकविले, असे त्यांनी सांगितले.

कलाकार-प्रेक्षकांत पुसट रेषा

‘गेला माधव कुणीकडे’ नाटकातील ‘अरे हाय काय अन् नाय काय’ ही भर (ऑडिशन) मला शंभराव्या प्रयोगाला सुचली. नाटककार वसंत सबनीस एका प्रयोगाला आले होते. ही भर चांगली असली तरी मी इतक्या वेळा वापरली नसती, असे सबनीस यांनी मला सांगितले. ‘प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील पुसट रेषा पुसली गेली तर तुझा हात वर गेल्यावर प्रेक्षकच ‘अरे हाय काय अन् नाय काय’ म्हणतील, असे त्यांनी सांगितले होते. त्याची प्रचीती मला प्रत्येक प्रयोगाला येत गेली, असे प्रशांत दामले यांनी सांगितले. नाटकात आणि रुपेरी पडद्यावरील वडील प्रत्यक्ष जीवनात कसे आहेत, या प्रश्नाला दामले यांनी वडील म्हणून मुलींसाठी सर्वच गोष्टी करता आल्या नाहीत हे सांगितले. पण उपलब्ध असेन तेव्हा तुमच्यासाठी हे मुलींनी स्वीकारले होते. त्यांना आवश्यकता असताना दहापैकी पाच वेळा मी उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

लंडनला ‘संशयकल्लोळ’

नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त लंडन येथील ‘पिकॉक’ या १११ वर्षांच्या रंगमंचावर ‘संगीत संशयकल्लोळ’चा प्रयोग झाला होता. त्या रंगमंचावर सादर होणारे ते पहिले मराठी नाटक ठरले, ही आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली. नाटकाचा सेट समुद्रमार्गे रवाना केला होता. २२ कलाकारांचा चमू घेऊन लंडनला गेलो होतो. त्या नाटय़गृहाचे दिवसाचे भाडे १७ लाख रुपये होते. ६३७ प्रेक्षकांनी हा प्रयोग पाहिला होता, असे दामले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:19 am

Web Title: mangesh kadam talks to prashant damle on loksatta sahaj bolta bolta zws 70
Next Stories
1 ‘आशयभान हवेच’
2 समाजमाध्यम   नको रे बाबा..!
3 अनवट साय-फायपट!
Just Now!
X