बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची सासू सविता छिब्बा यांच्या अलिबागमधील फार्म हाऊसवर तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शाहरुखची सासू सविता व मेहुणी नमिता छिब्बा हे ‘डेजा वू फार्म्स प्रायव्हेट लि.’चे संचालक आहेत. सविता यांच्या फार्महाऊसवर भाडेकरार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

२००८ मध्ये बांधण्यात आलेल्या या फार्म हाऊसवर अनेक बॉलिवूड पार्ट्या झाल्या आहेत. शाहरुखचा ५२वा वाढदिवससुद्धा येथेच साजरा करण्यात आला होता. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, २९ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी फार्महाऊसला नोटीस बजावली होती. प्लॉट विकत घेतल्यानंतर तेव्हाचे रायगडमधील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी १३ मे २००५ रोजी या जमिनीवर शेती करण्याची परवानगी दिली होती. प्लॉट खरेदी करताना मूळ जागेवर असलेलं फार्म हाऊस तोडून त्याजागी नवीन फार्म हाऊस बांधण्यात आले होते. हे बॉम्बे टेनन्सी अॅक्ट म्हणजेच भाडेकरार कायद्याच्या कलम ६३चे उल्लंघन असल्याचं नोटिशीत स्पष्ट केलंय. यासंदर्भात फार्म हाऊसच्या संचालकांना समन्स बजावण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्नही विचारण्यात आला.

काही सुनावण्यांनंतर २० जानेवारी २०२० रोजी अजून एक नोटीस पाठवण्यात आली. या नोटिशीत कायदा उल्लंघनबद्दल स्पष्ट सांगण्यात आले. तसेच ३ कोटी ९ लाख रुपयांचा दंड लवकरात लवकर भरावा असे आदेशही देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप शाहरुखच्या सासूने किंवा मेव्हणीने कोणतेही वक्तव्य केले नाही.