रेश्मा राईकवार

केवळ तीन नायिकांची गोष्ट पाहण्याचा योग हिंदी चित्रपट प्रेमींच्या वाटयाला क्वचितच येतो. नायकाचं अस्तित्व केवळ तोंडी लावण्यापुरतं असावं, पण ओढूनताणून आणलेलं नसावं, कथाही अगदीच परीकल्पना नसावी. हे सगळे जर-तरचे निकष पार करत निव्वळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेला नायिकापट म्हणून राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल.

what Saina Nehwal Said?
“मग मी काय करायला हवं होतं?”, बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा ‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेसला थेट प्रश्न
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सनन अशा म्हटल्या तर तीन वेगवेगळया पिढीच्या तीन नायिका. या तिन्ही अभिनेत्रींना एकत्र आणत सत्य आणि कल्पिताचं बेमालूम मिश्रण असलेली रंजक कथा अशी सगळी भट्टी ‘क्रू’ या चित्रपटाच्या निमित्ताने जमून आली आहे. गीता सेठी (तब्बू), जस्मिन कोहली (करीना कपूर खान) आणि दिव्या राणा फ्रॉम हरयाणा (क्रिती सनन) या तिघी कोहिनूर एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या हवाई सुंदरी. या तिघींची प्रत्येकीची एक वेगळी कथा आहे. तिघींची आपापली स्वप्नं आहेत. गीताला नवऱ्याबरोबर गोव्यात स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करायचं आहे. जस्मिनला छानछोकीने राहण्याची, ब्रॅण्डेड वस्तू मिरवण्याची खूप हौस आहे. तिला स्वत:चा सौंदर्यप्रसाधनांचा ब्रॅण्ड मोठा करायचा आहे. तर वैमानिक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दिव्यावर हवाईसुंदरी होऊन प्रवाशांची खातिरदारी करण्यात समाधान मानण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या स्वप्नांना दूर सारून वास्तवाशी सलगी केली तरी त्यांचं आयुष्य काही रुळावर येत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे कर्जात बुडालेली त्यांची कंपनी. आज किंवा उद्या परिस्थितीत सुधारणा होईल या आशेने आला दिवस पुढे ढकलणाऱ्या या तिघींना एका अजब गुपिताचा शोध लागतो. पैसे मिळवण्याचा हा मार्ग घ्यायचा की दिवसेंदिवस चिघळत चाललेल्या परिस्थितीची शिकार व्हायचं या गोंधळात असलेल्या तिघीजणी एक निर्णय घेतात. त्यातून पुढे निर्माण झालेला गोंधळ, कंपनीच्या मालकाचा समोर आलेला खरा चेहरा आणि मग चांगल्या-वाईटाशी सुरू झालेला या तिघींचा खेळ अशी सरळसोट रंजक कथा या चित्रपटात आहे.

हेही वाचा >>> ‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

कर्जात बुडालेली किंगफिशर एअरलाईन्स ही कंपनी आणि त्याचा सर्वेसर्वा असलेल्या विजय मल्यांचे देश सोडून पळून जाणे या वास्तव घटनेचा वापर याआधीही चित्रपटात करून झाला आहे. त्याचा अगदी थेट उल्लेख नसला तरी त्याच्याशी साधर्म्य राखत केलेली पात्ररचना आणि त्यावेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांची काय अवस्था झाली असेल असा वेगळा दृष्टिकोन घेऊन निधी मेहरा आणि मेहुल सुरी या लेखकद्वयीने चित्रपटाची कथा उत्तम रंगवली आहे. कथा खूप विलक्षण आहे असं काही नाही. त्या घटनेतलं वास्तव, कर्मचाऱ्यांची ससेहोलपट आणि त्यांच्या जीवावर कंपनीच्या मालकाने कमावलेले पैसे या बाबी सत्य आहेत. मात्र त्यातलं भावनिक नाटय कायम ठेवताना ते अंगावर येईल अशा पद्धतीने न मांडता त्यातून वेगळं कथानाटय रंगवण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. त्यामुळे पटकथेच्या अनुषंगाने त्याची तितकीच काहीशी सरधोपट पण हलकीफुलकी मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. या चित्रपटाची खरी गंमत त्याच्या कथेपेक्षा त्याच्या तीन नायिकांमध्ये आहे हे मान्य करावंच लागेल.

तब्बू, करीना आणि क्रिती या तिन्ही अभिनेत्रींनी खऱ्या अर्थाने चित्रपटात कमाल केली आहे. या तिघीजणींची आपापली अभिनयाची आणि चित्रपटांचीही स्वतंत्र शैली आहे. तिघीही तितक्याच लोकप्रिय आहेत. मात्र त्यांचे स्वभाव, त्यांचं व्यक्तित्व याचा खुबीने वापर करून घेत गीता, जस्मिन आणि दिव्या या तीन पात्रांची मांडणी करण्यात आली आहे. चाळिशी उलटलेल्या गीतासमोर अनेक कौटुंबिक समस्या आहेत. तिला तिच्या पतीची असलेली साथ हा एकमेव सुखावणारा धागा तिच्यापाशी आहे. तशी साधीसरळ, कोणाच्या अध्यातमध्यात नसलेली, आजूबाजूला काय चाललं आहे हे सगळं कळणारी पण त्यातलं आपल्याला हवं तेच आणि तेवढं घेणारी गीता वेळ आली की आपल्या हुशारीचा वापर करण्यातही वाकबगार आहे. गीताचे हे सगळे कंगोरे तब्बूने सहज साकारले आहेत. तिचं एकाचवेळी साधं दिसणं आणि ग्लॅमरस असणं दोन्ही पाहात राहण्यासारखं आहे. करीनाने साकारलेली जस्मिन ही काहीशी तिच्यासारखीच तडकभडक आहे. आईवडिलांच्या विभक्त होण्यामुळे एकाकी पडलेली जस्मिन आजोबांच्या मदतीने शिक्षण पूर्ण करते. तिला आजोबांसाठी सुखाचे दिवस आणायचे आहेत आणि आपली ऐषोरामात आयुष्य जगण्याचं स्वप्नही पूर्ण करायचं आहे. आणि कितीही ढालगज वाटली तरी ती मनाने तितकीच हळवी आहे. करीना जस्मिनच्या भूमिकेत चपखल बसली आहे. या दोघींना त्यांच्यापेक्षा तुलनेने कमी अनुभवी असलेल्या क्रितीने दिव्याच्या भूमिकेत उत्तम साथ दिली आहे. एकेकाळची खेळाडू, वैमानिक बनण्याचं स्वप्न पाहणारी हुशार दिव्या, परिस्थितीमुळे मूळचा आक्रमकपणा, न्यायाची चाड वगैरे गोष्टी हरवून बसलेली दिव्या क्रितीनेही सहजशैलीत साकारली आहे. या तिघींबरोबर दोन पुरुष कलाकार लक्षवेधी ठरले आहेत. तब्बूच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता कपिल शर्मा आणि कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेतील गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ या दोघांनीही आपापल्या भूमिका सुंदर केल्या आहेत. चित्रपटातील गाणी फारशी लक्षात ठेवण्यासारखी नाहीत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूनही तब्बू, करीना आणि क्रितीच्या धमाल अभिनयामुळे रंजक झालेली हवाई सफर निश्चितच धमाल आहे.

क्रू 

दिग्दर्शक – राजेश कृष्णन कलाकार – तब्बू, करीना कपूर खान, क्रिती सनन, कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ, राजेश शर्मा, शाश्वत चॅटर्जी, कुलभूषण खरबंदा.