हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘गॉडफादर’ म्हणून ओळखले जाणारे महेश भट्ट यांनी कित्येकांचं करिअर घडवलं. आजही शाहरुख खान, अजय देवगण यांच्यासारखे बडे कलाकार महेश भट्ट यांना आपला गुरु मानतात, पण हा गुरु स्वतःच्या मुलींचे करिअर या इंडस्ट्रीमध्ये घडवण्यात त्यांना फारशी मदत करू शकला नाही. आलिया भट्टने तर करण जोहरच्या चित्रपटातून सुरुवात करत वेगळाच मार्ग निवडला अन् ती स्वतःच्या हिंमतीवर यशस्वी झाली. महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट हिने मात्र आपल्या वडिलांच्या छत्रछायेत राहूनच या क्षेत्रात पदार्पण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत पूजाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मिथून चक्रवर्ती यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर पूजा झळकली. आमिर खानसह ‘दिल है की मानता नहीं’ म्हणत ती रातोरात स्टार झाली. त्यानंतर पूजाने आपल्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. तिने आजोबा नानाभाई भट्ट आणि वडील महेश भट्ट यांच्या पावलावर पाऊल ठेवून निर्मिती व दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही नशीब आजमावलं. बऱ्याच बोल्ड चित्रपटांची निर्मिती- दिग्दर्शन पूजाने केलं. अशा या लोकप्रिय अभिनेत्री, निर्मिती, दिग्दर्शक पूजा भट्ट हिचा आज वाढदिवस. यानिमित्ताने तिचा आजवरचा प्रवास थोड्यात पाहूयात.

अभिनेत्री पूजा भट्ट हिचा जन्म २४ फेब्रुवारी १९७२ रोजी मुंबईत झाला. महेश भट्ट यांची पहिली पत्नी किरण म्हणजे लॉरेन ब्राइन यांची मुलगी पूजा. पूजाला एक भाऊ असून त्याचं नाव राहुल भट्ट आहे, तो फिटनेस ट्रेनर आहे. याशिवाय पूजाला दोन सावत्र बहिणी आहेत. एक आहे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि दुसरी आहे लेखिका शाहीन भट्ट. आलिया व शाहीन या महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांच्या मुली आहेत.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

लहान वयातच मद्याच्या आहारी

पूजाचं शिक्षण पारसी शाळेत झालं होतं. १२वी नापास असूनही तिचं इंग्रजी हे पारसी शाळेमुळे चांगलं आहे, असं तिनेच ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात सांगितलं होतं. सुरुवातीस महेश भट्ट व सोनी राजदान यांच्याशी तिचे संबंध फारसे चांगले नव्हते. आपल्या आईशी महेश यांनी घटस्फोट घेतल्याचा राग पूजाच्या मनात होता. एवढंच नाहीतर वडिलांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न केल्यामुळे तिला काही काळ नैराश्याने घेतले होते. त्यामुळे लहान वयात पूजा मद्याच्या आहारी गेली. पण कालांतराने पूजा, महेश भट्ट व सोनी राजदान यांच्यातला दुरावा संपुष्टात आला, तिघांचं नातं चांगलं झालं. पण दरम्यानच्या काळात मद्यपानामुळे पूजाचा जीव धोक्यात आला होता. वयाच्या चाळीशीनंतर वडिलांच्या सल्ल्याने तिने मद्यपान सोडलं.

हेही वाचा – अभिनयासाठी घर सोडलं, पंजाब ते बॉलीवूडपर्यंत ‘असा’ होता शहनाझ गिलचा प्रवास

अभिनेत्री ते दिग्दर्शक

महेश भट्ट यांनी पूजाला वयाच्या १७व्या वर्षी बॉलीवूडच्या पडद्यावर आणलं. १९८९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटातून पूजाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात तिने साकारलेली पूजा ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीचं पसंतीस उतरली. तिला या चित्रपटासाठी पहिला पुरस्कार मिळाला. ‘फिल्मअफेअर न्यू फेस ऑफ द इअर’ या पुरस्काराने तिला गौरविण्यात आलं. पण अभिनेत्रीला अधिक प्रसिद्धी मिळाली ती १९९१ साली ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटामुळे. बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानसह या चित्रपटात पूजा झळकली. या चित्रपटासाठी पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ‘दिल है की मानता नहीं’ हा चित्रपट आणि गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने बरेच चित्रपट केले. ‘सडक’, ‘जुनून’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘पेहेला नशा’, ‘अंगरक्षक’, ‘चाहत’, ‘नाराज’, यांसारख्या अनेक चित्रपटात तिने काम केलं. ९० दशकात पूजा जितकी तिच्या अभिनयामुळे चर्चेत होती, तितकीच ती तिच्या हॉट आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असायची. पण कालांतराने तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायचे बंद झाले. त्यामुळे पूजाने आपल्या आजोबा आणि वडिलांप्रमाणे निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्राकडे वाट वळवली.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

१९९६ साली तिने ‘पूजा भट्ट प्रोडक्शन’ ही स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिस्म’ या चित्रपटाची निर्माती पूजा भट्ट केली. ‘पाप’, ‘हॉलीडे’, ‘धोखा’, ‘कजरारे’, ‘जिस्म २’ अशा बऱ्याच चित्रपटाचं तिने दिग्दर्शन केलं. पूजाने चित्रपटांसह वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बॉम्बे बेगम’ या सीरिजमध्ये तिने राणी इराणी उत्कृष्टरित्या साकारली. अनेकांनी या सीरिजमधल्या अभिनेत्रीच्या कामाचं कौतुक केलं. या सीरिजमध्ये पूजा शेवटची दिसली होती. त्यानंतर ती थेट ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात झळकली.

‘त्या’ फोटोमुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात

नव्वदच्या दशकात पूजाच्या बोल्ड फोटोशूटने तर वादाचे मोहोळ उठले. तिचं एक न्यूड फोटोशूट त्या काळात भयंकर गाजलं होतं. त्यानंतर पूजा वादाच्या भोवऱ्यात अडकली ते एका मॅगझिनवरील फोटोमुळे. या फोटोमध्ये पूजा आणि महेश भट्ट यांचे लिपलॉक चित्रित करण्यात आले होते. या फोटोमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. यादरम्यान महेश भट्ट यांच्या एका विधानाने हा वाद आणखीचं पेटला. एका मुलाखतीमध्ये महेश म्हणाले, “जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याबरोबर लग्न केलं असतं.” या विधानाने वादाचा वणवा अधिकच भडकला. यावरून महेश भट्ट यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. कालांतराने हा वाद मिटला पण पूजा व महेश भट्ट यांच्या त्या फोटोची चर्चा आजही होत असते.

अधुरी प्रेमकहाणी

१९८९साली सुरू झालेल्या पूजाच्या आजवरच्या करिअरमध्ये तिचं नाव अनेकांबरोबर जोडण्यात आलं. ‘आशिकी’ या चित्रपटाला बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून अभिनेत्रीने नकार दिला होता. “हा चित्रपट केलास तर लग्न करणार नाही,” असं तिला धमकावण्यात आलं होतं. त्यामुळे पूजाने नंतर सुपरहिट ठरलेला ‘आशिकी’ चित्रपट सोडून दिला. पण काही काळानंतर तिचं ते नातंच संपृष्टात आलं. त्यानंतर पूजा अभिनेता रणवीर शौरीसह बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. ‘जिस्म’ या चित्रपटाच्या दरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. सुरुवातीला दोघं चांगले मित्र होते. पण नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एवढंच नाहीतर दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण हे नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. पूजाने या ब्रेकअपला शौरीलाच कारणीभूत ठरवलं. रणवीर तिच्याशी गैरवर्तणूक करत होता, मद्याच्या आहारी गेला होता आणि अनेकदा मारहाण केल्याचा आरोपही तिने केला होता. पण रणवीरने मात्र वेगळंच कारण सांगितलं. त्याने पूजाची गोष्ट उलट असल्याचंच सांगितलं.

हेही वाचा – ‘पांडू हवालदार’पूर्वी अशोक सराफ यांनी का घेतला होता चार वर्षांचा ब्रेक? जाणून घ्या…

एका मुलाखतीमध्ये त्याने ब्रेकअपच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे स्पष्ट केलं होतं. नेहमीप्रमाणे तो पूजाच्या घरी होता. इतर जोडप्यांमध्ये ज्याप्रमाणे भांडणं होतात, तसंच यांच्यामध्येही सुरू झालं. त्यानंतर रणवीरने नातं मोडण्याचा निर्णय घेतला. कारण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे अभिनेत्याने स्वतःची बॅग भरली आणि तो निघून गेला. घराबाहेर गेल्यानंतर रणवीरला आपली दुसरी बॅग विसरल्याचं लक्षात आलं. म्हणून त्याने पूजाला अनेक फोन केले. पण पूजाने फोन उचलले नाहीत. मात्र रणवीर फोन करत राहिला. तितक्यात त्याला काच फुटल्याचा आवाज आला. अभिनेत्याने मागे वळून पाहिलं तर गाडीच्या दोन काचा फोडलेल्या होत्या. बाहेर येऊन पाहिलं तर पूजाचा भाऊ राहुल लोखंडी रॉड घेऊन उभा होता. हे पाहून अभिनेता हैराण झाला. त्यानंतर त्या रॉडने अभिनेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, असं रणवीरने सांगितलं होतं.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

रणवीर शौरीच्या प्रकरणानंतर पूजाच्या आयुष्यात आला मनीष मखीजा. मनीष हा उधम सिंह नावाने प्रसिद्ध होता. तो एक भारतीय व्हीजे आणि मुंबईतील एका रेस्टॉरंटचा मालक होता. सुरुवातीला पूजा व मनीषची चांगली मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २००३मध्ये दोघांनी लग्न केलं. पण पूजाचं हे नातंदेखील काही काळातच तुटलं. लग्नाच्या ११ वर्षांनंतर पूजाने मनीष मखीजाबरोबर घटस्फोट घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja bhatt birthday special her bollywood film industry journey entdc pps
First published on: 24-02-2024 at 12:11 IST