गायत्री हसबनीस

गेली अनेक वर्षे दूरचित्रवाणी, मालिका, चित्रपट या सर्वच माध्यमांतून अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. ‘मधुरव’ या पुस्तकामुळे मधुराचे नवे पैलू तिच्या चाहत्यांसमोर आले. मधल्या काळात दूरचित्रवाणीपासून दूर असलेली मधुरा ‘सोनी मराठी’वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून बारा वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या पुन:पदार्पणाबद्दल आणि आपल्या नव्या मालिकेबद्दल मधुराने मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

‘‘श्रद्धा ही एक शिक्षिका आहे त्याचसोबत ती एकत्र कुटुंबात राहणारी आहे. तिचा भूतकाळही थोडा कडवट असल्याने तोही मध्येच डोकं वर काढत असतो. तशी ती तत्त्ववादी, शिस्तप्रिय आणि घरात सगळय़ांना सांभाळून  घेणारी असली तरी भूतकाळातल्या त्या काही घटना समोर आल्यावर ती भावनिक होते’’, असे आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना मधुराने स्पष्ट केले. अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हिने ‘सोनी वाहिनी’वरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून बारा वर्षांनी दूरचित्रवाणीवर पुन्हा एकदा पदार्पण केले आहे. हातात पिस्तूल घेऊन पडद्यावर बेधडकपणे वावरताना दिसणारी मधुरा आजवरच्या तिच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारताना दिसते आहे.  सर्वसामान्य शिक्षिका असली तरी ती अन्याय न सहन करणारी आजची आधुनिक स्त्री आहे आणि हेच तिचं वैशिष्टय़ आपल्याला भावलं असं मधुरा म्हणते.

‘‘एकीकडे माया करणारी प्रेमळ आई आपण नेहमीच पाहतो आणि दुसरीकडे जेव्हा संकटसमयी चूक आणि बरोबर याचा फारसा विचार न करता त्या क्षणी काय गरजेचं आहे तेच हेरून तसं पाऊल उचलणारी आईही असते. या मालिकेतील आईदेखील अशीच आहे जिचं पात्र मी रंगवते आहे. मी साकारलेल्या आईची व्यक्तिरेखा काही आनंदाने पिस्तूल हातात धरत नसून तिच्यावर ती पिस्तूल धरण्याची वेळ काही कारणास्तव आली आहे आणि ती धरण्याची धमकही त्या आईकडे आहे.  मुलीवर आलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता लढणारी ती धाडसी बाई आहे. त्यामुळे वरकरणी दिसायला तुमच्या आमच्यासारखी साधी स्त्री असली तरी ती संकट आल्यावर लढवय्या होणारी, दुर्गेचे रूप घेणारी आई आहे. त्याचप्रमाणे वेळप्रसंगी ती चुकूही शकते म्हणून माणूस म्हणूनही तिच्याकडे पाहा असं सांगणारी आई आहे’’, असं मधुराने आपल्या व्यक्तिरेखेबद्दल अधिक उलगडून सांगितले. 

बारा वर्षांनंतर मधुरा पुन्हा एकदा दूरचित्रवाणीवर काम करत असताना इतक्या वर्षांत या माध्यमात झालेल्या बदलांबद्दलचे निरीक्षणही तिने नोंदवलं. तिच्या मते, ‘‘दूरचित्रवाणी हे माध्यम आता अधिक व्यावसायिक झालं आहे. यात तांत्रिक बाबींमध्ये खूप फरक झाला आहे. असं म्हणू शकतो की दूरचित्रवाणीची परिभाषाच बदलून गेली आहे. चित्रीकरणाची पद्धतही बदलली आहे. पूर्वी लुक टेस्टच्या सतराशे साठे भानगडी नव्हत्या. आता लुक टेस्टचा जमाना आहे. त्यातून निर्माते, वाहिनी आणि प्रेक्षकांची आवडनिवड यांचा अभ्यास केला जातो, तसंच त्यावरून पात्र, चेहरे आणि कथाही विकसित केल्या जातात. एकदंरीत परिमाणं थोडी बदलली आहेत’’, असं ती सांगते.  ‘‘तरीही प्रेक्षकांना चांगला आशय दिला तर तो नक्की पाहतात, कारण आशय महत्त्वाचा असतो’’, असं मतही ती प्रामाणिकपणे मांडते. 

 ‘‘इतक्या वर्षांनी या माध्यमात काम करायचं तर मला चांगला विषय करायचा होता. पुन्हा सासू-सूनेच्या मालिका करणं मनाला पटलं नसतं. ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेचा विषय मला तरुणांच्या जवळचा आणि जळजळीत वास्तवादी वाटला आहे. मी यात पिस्तूल हातात घेऊन तो थरार अनुभवते आहे. याआधी मी दोन नाटकांमधून दोन वेगळय़ा भुमिकांमधून पिस्तूल घेत तो थरार प्रेक्षकांपुढे आणला होता. अर्थात, नाटकांपेक्षा या मालिकेतील भूमिका वेगळी आहे, त्यामुळे ती कथा आणि तो थरारही वेगळा आहे. एकतर मला या मालिकेचा विषय जेवढा महत्त्वाचा वाटला तेवढीच ही भूमिकासुद्धा आव्हानात्मक वाटली. यातून हाच एक महत्त्वाचा भाग पुढे येतो की संकटसमयी तुम्ही धीराने आपल्या पाल्याच्या, प्रियजनांच्या सुरक्षितेसाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी उभे राहिले पाहिजे’’, असं ती म्हणते.  आजच्या पालक आणि मुलांमध्ये असलेल्या भावनिक नात्यांबद्दलही ती मनमोकळेपणाने बोलते. ‘‘पालकांनी आपल्या पाल्यासोबतचा आपला संवाद किती कायम आहे याचा विचार करायला हवा. त्यातूनही आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात मुलं पालकांपासून अनेक गोष्टी सहजपणे लपवू शकतात. त्याबद्दल सतर्क राहणं हे अनेकदा पालकांसाठी आव्हानच आहे, असं ती म्हणते. कित्येकदा मुलांना आईवडिलांबरोबर मैत्रीचं नातंच नको असतं. पालकांना हेही महिती असतं की मुलं आपल्याशी खोटं बोलत आहेत, पण तरीही त्या परिस्थितीत मुलांना सांभाळून घेणं हे पालकांना कठीण जातं. तर अनेकदा मुलांनाही हातातून वेळ गेल्यानंतर आपण पालकांशी संवाद साधायला हवा होता याची जाणीव होते.

एकूणच आत्ताच्या काळात पालक आणि मुलं यांच्यातील गुंतागुंतीचं नातं हा विषयच महत्त्वाचा आहे आणि त्यातलंच हे एका आईचं पात्र आहे. त्यामुळे या मालिकेतून दररोज धागेदारे, रहस्य आणि थरार पाहायला मिळणार आहे. यात नावीन्य तर आहेच आहे, एकप्रकारे वेबमालिकेचा अनुभव देणारी अशी ही मालिका असल्याचं तिने सांगितलं. ‘‘माझे आईवडील याच क्षेत्रात इतकी वर्षे काम करत असल्याने मीही माझ्या कामाविषयी त्यांना आवर्जून सांगत असते. आमच्यात तो संवाद कायम आहे’’, असं सांगतानाच आपल्यावर आईवडिलांचा खूप चांगला प्रभाव आहे, हेही ती कबूल करते. आज काम करताना त्याचा मला खूप फायदा होतो, पण या मालिकेच्या निमित्ताने आईबाबांनी इतकी वर्षे आपल्यासाठी केलेले कष्ट लक्षात आले,  हेही मधुरा प्रांजळपणे सांगते. सध्या ट्रोिलगचे प्रकारही वाढत आहेत, त्यातून दूरचित्रवाणीवरील आशयावर प्रचंड ट्रोिलग केले जाते, मीम्स फिरायला लागतात तेव्हा आपल्या हातात आपलं काम चोख करत राहणं, याशिवाय पर्याय नाही, असं ती स्पष्ट करते. कोणाला ते आवडेल किंवा नाही आवडणार हे लक्षात घेऊन प्रेक्षकवर्गाचा आदर करत पुढे जाणं हेच कलाकार म्हणून आपल्या हातात आहे, असं ती ठामपणे सांगते.