रेश्मा राईकवार

मनोरंजनाच्या ‘ओटीटी’ माध्यमांवर प्रेक्षकांची झुंबड उडत असली तरी पायरसीचेही प्रमाण वाढल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पायरसीमुळे केवळ शुल्कातून जमा होणाऱ्या उत्पन्नावरच परिणाम झालेले नाही, तर जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही ३० टक्के  घट झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर सक्तीने घरी बसावे लागलेल्या प्रेक्षकांनी ओटीटी (ओव्हर द टॉप) माध्यमांना जवळ केले. एप्रिल ते जून या तीन महिन्यांतच प्रमुख ओटीटी कं पन्यांनी भरभराट अनुभवली. गेल्या वर्षी या वाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या वाढली आणि केवळ शुल्कापोटी मिळालेले त्यांचे उत्पन्न १९ हजार कोटींच्या घरात पोहोचले. आता येत्या दोन वर्षांत ओटीटी कंपन्यांचे उत्पन्न जवळपास ३३,८०० कोटींच्या आसपास पोहोेचेल, असे भाकीत करण्यात येत असले तरी या माध्यमालाही ‘पायरसी’ची वाळवी लागली आहे.

‘स्कॅम १९९२’ ही ‘सोनी लिव्ह’वरील वेबमालिका आणि ‘एमएक्स प्लेयर’वरील ‘आश्रम’ या दोन गाजलेल्या वेबमालिका दाखल होताच अध्र्या तासात त्यांची पायरेटेड आवृत्ती ऑनलाइन उपलब्ध झाली होती. एखादी गाजलेली वेबमालिका, वेबपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाली असेल आणि ती त्याच वेळी भारतात उपलब्ध होत नसेल तर लोक पायरसीकडे वळतात किं वा एखाद्या ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रम पाहण्यासाठी शुल्कापोटी भरभक्कम रक्कम मोजावी लागत असेल तर लोक पायरेटेड कार्यक्रमांकडे वळतात, अशी माहिती ‘लायन्सगेट प्ले’चे कार्यकारी उपाध्यक्ष अमित धानुका यांनी दिली, तर ओटीटी कंपन्यांसाठी सध्या पायरसी हे दुधारी शस्त्र ठरत असल्याचे ‘अल्ट बालाजी’च्या मार्केटिंग विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष दिव्या दीक्षित यांनी सांगितले. ‘पायरसीमुळे ‘एसव्हीओडी’च्या (सबस्क्रिप्शन बेस्ड व्हिडीओ ऑन डिमान्ड) आर्थिक उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे. भरभराटीच्या दिशेने जात असलेला हा व्यवसाय आणखी दोन पावले मागे येत आहे. पायरेटेड आवृत्ती सहज उपलब्ध होत असल्याने भविष्यातील सशुल्क प्रेक्षकांची संख्या कमी होतेच, पण जे प्रेक्षक सध्या शुल्क भरून कार्यक्रम पाहत आहेत तेही पायरसीकडे वळतात, अशी खंत दीक्षित यांनी व्यक्त केली.

‘पायरसी’चा फटका ‘एमएक्स प्लेअर’सारख्या जाहिरातींवर आधारित ‘स्ट्रीमिंग’ कं पन्यांनाही बसत आहे. ‘एमएक्स प्लेअर’वरील कार्यक्रम-मालिका पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही, तरी पायरेटेड वेबमालिका पाहिल्या जात असल्याने अर्थातच कं पनीच्या जाहिरातीच्या उत्पन्नावर परिणाम होतो. दररोज एक ते दोन कोटी प्रेक्षक ‘एमएक्स प्लेअर’वरील कार्यक्रम गैरमार्गाने पाहतात, अशी माहिती ‘एमएक्स प्लेअर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण बेदी यांनी दिली. आपला पासवर्ड मित्र-नातेवाईकांना देऊन वेबमालिका पाहिल्या जातात, शिवाय टेलीग्रामसारख्या अ‍ॅप्सवरूनही पायरेटेड कार्यक्रम शोधला जात असल्याने ओटीटी कं पन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. ६० टक्के  प्रेक्षक सध्या गैरमार्गाने कार्यक्रम पाहतात, अशी माहिती ‘ऑरमॅक्स मीडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश कपूर यांनी दिली.

उपाय नाहीच… पायरेटेड कार्यक्रम उपलब्ध होऊ नयेत, यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. विविध डिजिटल साधनांच्या माध्यमातून आम्ही एका दिवसात अशा दोन हजार लिंक्स बंद के ल्या होत्या, मात्र हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. सध्या तरी प्रेक्षकांना पायरेटेड कार्यक्रम पाहू नका, अशी विनंती आम्ही करू शकतो. पायरसी प्रेक्षकांच्या वैयक्तिक माहितीसाठीही धोकादायक ठरू शकते. ऑनलाइन उपलब्ध असलेली प्रेक्षकांची वैयक्तिक माहिती (डेटा)ची चोरी करून गैरवापर केला जाऊ शकतो, याची जाणीव आम्ही करून देत आहोत, असे ‘अल्ट बालाजी’च्या दिव्या दीक्षित यांनी सांगितले.