रेश्मा राईकवार

कित्येक पिढय़ांनी पाळलेल्या जीवघेण्या प्रथांवर काळाचं पांघरूण घातलं तरी त्याचे परिणाम पुढच्या पिढीला डसल्याशिवाय राहात नाहीत. त्या परिणामांची जाणीव तरी किमान त्यांना टोचणी देऊन जाणारी असते. टेरी समुंद्रा दिग्दर्शित ‘काली खुही’ हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहताना कळत नकळत आपणही या भयंकर पापाचे धनी आहोत, हा विचार आपल्याला कुठेतरी अस्वस्थ करून जाईल, इतक्या प्रतीकात्मक पद्धतीने चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. मात्र भयपटांच्या शैलीत अकल्पिताचा खेळ रंगवत असताना ही रूपकात्मक मांडणी हरवली आहे. कथेवरची पकड अनेक ठिकाणी सुटली आहे. भयपट म्हणून क्वचितप्रसंगी श्वास रोखून धरायला लावणारा हा चित्रपट तर्काच्या कसोटीवर उतरत नाही.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न

स्त्री-भ्रूण हत्या हा विषय या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पंजाबमधील एक गाव विचित्र शापाच्या सावटाखाली जगते आहे. दूर शहरात शिकणाऱ्या शिवांगीला आजी आजारी असल्याने अचानक आई-वडिलांबरोबर आपल्या गावी यावे लागते. शिवांगीच्या आईची गावी परतण्याची इच्छा नाही, मात्र नवऱ्याच्या हट्टापायी मुलीला घेऊन तिला गावी यावे लागते. या गावच्या वातावरणातच एक विचित्र अस्वस्थता आहे, गावात पाऊल टाकताच या विचित्रतेची जाणीव शिवांगीचा ताबा घेते. शिवांगीची आई आणि वडील यांच्यात आजीच्या वागण्यावरून असलेला तणाव, आजीचा नातूच हवा हा हट्ट हे हळूहळू शिवांगीपर्यंत पोहोचतं आहे, याची जाणीव होईपर्यंत एकामागोमाग एक गूढ घटना वेगाने घडत राहतात. शिवांगीच्या आजीच्या शेजारी राहणाऱ्या सत्या मासीला (शबाना आझमी) या गूढ घटनांमागचं कारण माहिती आहे. गावाला मिळालेला शाप पुन्हा जागृत झाला आहे, याची जाणीव तिला होते. शेतात कधी काळी बंद असलेली विहीर आणि या विहिरीतील काळ्या डोहाने गिळलेल्या कित्येक नवजात मुलींचे हुंकार, त्यांच्या वेदना नव्याने लहानग्या शिवांगीपर्यंत पोहोचतात. तेव्हा शिवांगीसह आपणही थरारून जातो.

एक खूप मोठा काळ असा गेला आहे, जेव्हा दरदिवशी कुठल्या ना कुठल्या गावात मुलगी झाली म्हणून तिला विषाचं चाटण देऊन मारण्यात आलं आहे. कित्येक मातांनी इच्छा नसतानाही आपल्या मुलीचं मरण याचि देही याचि डोळा पाहिलं आहे. काळ बदलला, मुली शिकल्या, स्वतंत्र झाल्या.. सन्मानाने जगू लागल्या, म्हणून काळाच्या डोहात दडलेलं हे कटू सत्य पुसलं जाऊ शकत नाही आणि प्रत्यक्ष हा अपराध केला नसला तरी त्याला विरोध न करता सहन केलेल्यांनाही यातून क्षमा मिळणार नाही, हा विचार या चित्रपटातून मांडण्यात दिग्दर्शिका टेरी समुंद्रा काही प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत. या विषयासाठी भयपट शैलीचा आधार घेत केलेली मांडणी हे कटू सत्य अधिकच गडद करतो. संपूर्ण चित्रपटभर ही काळी गडद छाया आपली साथ सोडत नाही, इतक्या प्रभावी पद्धतीने कॅमेऱ्याने या प्रतिमा टिपल्या आहेत. सेजल शाह यांच्या अप्रतिम छायाचित्रणाने या चित्रपटाला खरा अर्थ दिला आहे. मात्र कथेला अनेक ठिकाणी विनाकारण देण्यात आलेली वळणं, कल्पित कथा असली तरी अतार्किक घटनांची केलेली पेरणी आणि त्यातून कुठल्याही निष्कर्षांप्रत न येता नुसताच मरणमारणाचा रंगवलेला खेळ यामुळे मूळ विषयाला हरताळ फासला गेला आहे. शबाना आझमी हे एकमेव मोठं नाव या चित्रपटात आहे, मात्र त्यांची भूमिका यात तोंडी लावण्यापुरती येते. सत्या मासी ही महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात त्यांच्या भूमिकेला कंगोरेच नाहीत. त्याउलट, हा संपूर्ण चित्रपट शिवांगीची भूमिका करणाऱ्या छोटय़ा रिवा अरोराने बऱ्यापैकी आपल्या अभिनयाने पेलून धरला आहे. संजीदा शेख, सत्यदीप मिश्रा, लीला सॅमसन अशा वेगळ्या कलाकारांचे चेहरे या चित्रपटात पाहायला मिळतात, त्यामुळे नेहमीपेक्षा काहीएक वेगळेपणा अनुभवायला मिळतो. इतका सुंदर विषय घेऊन आलेला चित्रपट फार तोकडा अनुभव देऊन जातो.

काली खुही

दिग्दर्शक – टेरी समुंद्रा

कलाकार – शबाना आझमी, रिवा अरोरा, सत्यदीप मिश्रा, संजीदा शेख, लीला सॅमसन.