श्रेया बुगडे – response.lokprabha@expressindia.com
सेलिब्रिटी लेखक
अनेकांच्या नकला करण्याचा बालपणीचा छंद मला ‘चला हवा येऊ द्या’पर्यंत घेऊन येईल याची कल्पनाच नव्हती. प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणणं या दोन्ही गोष्टी मी या प्रवासात शिकले.

‘तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..’ हे गाणे टिपेच्या आवाजात गाणारी ट्रेनमधली मुलगी.. एकसुरी आवाजात प्रेक्षणीय स्थळांविषयी माहिती देणारा गोव्याचा टुरिस्ट गाइड.. रोजची दारावर येणारी भाजीवाली, भंगारवाला, केळीवाला या सर्वाची नक्कल करण्याचा माझा बालपणीचा छंद मला ‘वाटेवरती..’पासून ‘चला हवा येऊ द्या’पर्यंत घेऊन येईल याची मला पुसटशीदेखील कल्पना नव्हती.

environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

‘फू बाई फू’च्या गेस्ट एपिसोडसाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी काहीशी साशंक होते. विनोद आणि विनोदनिर्मिती आपल्यासाठी नाही, आपल्याला ते जमणारच नाही, असंच मला वाटलं होतं. आपल्याला त्यासाठी कोणी विचारणारच नाही असंच वाटायचं. कारण त्याआधी अभिनयाचा हा प्रकार मी कधीच केला नव्हता. पण अचानक ‘फू बाई फू’ची संधी आली आणि काहीशी घाबरतच मी ती घेतली. बरोबर अभिनयातले दिग्गज कलावंत असल्यामुळे सुरुवातीला मी थोडीशी चाचपडतच होते. पण सर्व कलाकारांनी चांगली साथ दिली, सांभाळून घेतलं. म्हणून मी आज इथे आहे. ‘हवा येऊ द्या’सारख्या प्रेक्षकप्रिय कार्यक्रमाचा एक भाग आहे. अभिनयाने लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणं त्या मानाने सोप्पं, पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे कठीण. ‘वाटेवरती’पासून ‘.हवा येऊ द्या’चा प्रवास मला हेच शिकवून गेला.

‘चला हवा येऊ द्या’चा प्रत्येक एपिसोड माझ्यासाठी नवा अनुभव आहे. रोज नवी परीक्षा आहे. रोज नवा आनंद आहे. या कार्यक्रमातून मी रोज नव्या, वेगवेगळ्या भूमिका साकारते. प्रेक्षकांना हसविण्याचं काम करते. हे काम नेहमीपेक्षा वेगळं आहे. रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या, दु:खाला सामोरं जावं लागणाऱ्या लोकांच्या जीवनात आपण आनंदाचे क्षण देतो, याचं खूप समाधान वाटतं. गेली तीन वर्षे सतत झी मराठीवरील हा कार्यक्रम लोकांचं निखळ मनोरंजन करतो आहे. या प्रेक्षकांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यांना वेड लावलं आहे. प्रेक्षक आपल्यावर मनापासून प्रेम करतात, ही भावनाच खूप सुखावणारी आहे. कुठल्याही कलाकारासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

‘हवा येऊ द्या’ने मला खूप काही दिले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या मनात माझ्याविषयी एक खास जागा निर्माण केली. मला ओळख दिली. आजही रस्त्याने चालताना अनेकजण भेटतात. आपल्या आयुष्यात ‘हवा येऊ द्या’चा किती मोठा वाटा आहे, हे पुन:पुन्हा सांगतात. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या या कार्यक्रमाचा मी एक भाग असल्याचा मला खूप आनंद होतो. परवाच पुण्यात लक्ष्मी रोडवरून चालताना एक माऊली भेटल्या. म्हणाल्या, ‘मला तुला मिठी मारायचीय. तुमच्या कार्यक्रमामुळे मी आज आनंदात आयुष्य जगते आहे.’ नंतर कळलं की त्या नुकत्याच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून नव्याने उभ्या राहिल्या होत्या. म्हणाल्या, ‘माझ्या त्या कठीण काळात तुमच्या कार्यक्रमाने मला हसवलं. मला नवीन आयुष्य जगण्याची उमेद दिली. मी तुमची खूप ऋणी आहे.’ मी प्रेमाने त्यांना मिठीच मारली. त्यांचे ते आनंदाश्रू मी कधीच विसरणार नाही.

अनेकजण भेटतात, सांगतात, ‘तुमचा कार्यक्रम कधीच चुकवत नाही. साडेनऊला रात्री घरी पोहोचण्यासाठी धावपळ करतो. तुमचा कार्यक्रम बघून आम्ही पुढे आठवडाभर ताजेतवाने होतो.’ समस्या, ताणतणाव कोणालाही चुकलेले नाही, पण या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी हसणं किती गरजेचं आहे हे जाणवतं. लोकांच्या चिंता-विवंचनांचा थोडय़ा काळापुरता का होईना विसर पाडून त्यांना आनंद देणे यापेक्षा दुसरा आनंद काय असेल. अशा कित्येक लोकांना औदासीन्यातून बाहेर काढून त्यांना नवीन उमेद, नवी उभारी देण्याचं काम ‘हवा येऊ द्या’ सातत्याने करत आहे.

नुकताच आम्ही या कार्यक्रमाचा विश्वदौरा केला. मराठी भाषा दूरवर पोहोचावी यासाठी झी मराठीने केलेला तो एक यशस्वी प्रयत्न होता. नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी परदेशात स्थायिक झालेली अनेक मराठी मनं यानिमित्ताने एकत्र आली. परदेशात राहूनही मराठी भाषा, मराठी संस्कृतीचे बंध त्यांनी अजूनही जपलेले आहेत, हे जाणवलं. तिथल्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांचं प्रेम दिसलं. ‘तुमच्या कार्यक्रमामुळे आमची मुलं मराठी कार्यक्रम बघायला लागली. त्यांना मराठी भाषेची गोडी लागली.’ हे त्यांनी आवर्जून सांगितलं.

‘माझ्या ७५ व्या वाढदिवसाला तुमच्या कार्यक्रमाची तिकिटे माझ्या मुलाने मला भेट दिली. यापेक्षा वाढदिवसाची कोणती मोठी भेट असू शकेल.. आज तुमची प्रत्यक्ष भेट झाली’, असे सांगणाऱ्या लंडनस्थित आजींना नमस्कार करताना डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.

‘हवा येऊ द्या’च्या सेटवर अनेक दिग्गज मान्यवर कलाकार येतात. कधी काळी ज्यांना नुसतं पाहण्याचं, ज्यांच्याबरोबर काम करण्याचं फक्त स्वप्नच होतं ते प्रत्यक्षात समोर येतात. ते सगळेच काम करताना आपल्या मोठेपणाचा बाऊ न करता आमच्यामध्ये सहज मिसळून जातात यावर क्षणभर विश्वासच बसत नाही. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार या मंचावर येतात तेव्हा त्यांचा साधेपणा, शिस्तबद्ध वागणं यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, हे समजतं.

ही मंडळी अनेक सामाजिक कार्यासाठी आर्थिक भार उचलताना दिसतात. आमीर खानसारखा मोठा कलाकार आपल्या पत्नीसोबत सर्वाना भेडसावणाऱ्या भीषण पाणी प्रश्नावर इतक्या तळमळीने काम करताना दिसतो. ही सर्व मंडळी अनेक सेवाभावी संस्थांना सढळ हस्ते मदत करताना दिसतात. या सर्वाची ही दुसरी बाजू लोकांसमोर आणण्याचं काम या कार्यक्रमाने केलं. आणि माझा अभिमान आणखी दुणावला.

‘हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम नुसता टीव्हीपुरता मर्यादित नाही. तो आता अनेकांच्या जीवनाचा भाग झालाय. कारण तो प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंजन करत नाही तर त्याबरोबरीने बरंच काही देतो. कार्यक्रमातून आपल्या भेटीला येणारे पोस्टमन काका हे याचंच उदाहरण. सागरचा धीरगंभीर आवाज आणि वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घालणारे आमचे लाडके लेखक अरविंद जगताप यांचे भावुक शब्द मनाला स्पर्श करून जातात. नुकताच दहावीच्या पाठय़पुस्तकात त्यांचा एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. आणि त्यामध्ये ‘हवा येऊ द्या’चा उल्लेख आहे. ही आमच्यासाठी आणखी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

भारत, भाऊ, कुशल, सागर, अंकुर यांची अप्रतिम अदाकारी या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. या सर्व कुशल कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी  खूप मोठी गोष्ट आहे. गेली साडेतीन वर्षे हा कार्यक्रम मी करते आहे. प्रत्येक भाग माझ्यासाठी एक नवीन आव्हान, एक नवीन परीक्षा आहे. डॉ. नीलेश साबळेच्या उत्तम मार्गदर्शनाखाली मी रोज नवे काहीतरी शिकते आहे.

‘हवा येऊ द्या’ची संपूर्ण टीम, पडद्यामागे अहोरात्र राबणारे हात, कलाकार, तंत्रज्ञ यांची प्रचंड मेहनत यामुळे हा कार्यक्रम केवळ मराठीच नव्हे तर परप्रांतीय प्रेक्षकांचासुद्धा आवडता कार्यक्रम झाला आहे. घराघरांत पोहोचला आहे. अनेक कुटुंबांची मने जोडतो आहे. गेली अनेक वर्षे झी मराठी प्रेक्षकांबरोबर, कलाकारांबरोबर कौटुंबिक नाते टिकवून आहे. प्रेक्षकांची मिळणारी उत्साही दाद आणि त्यांचे प्रचंड प्रेम हा माझ्यासाठी आशीर्वाद असून तो कायम राहील हा विश्वास आहे.

मनातल्या भावना शब्दांद्वारे व्यक्त करण्याची खूप दिवसांची इच्छा मनात होती. पण तसा कधी प्रयत्न केला नव्हता. ‘लोकप्रभा’मुळे ती संधी मिळाली. प्रेक्षकांनी  आजपर्यंत माझ्यावर खूप प्रेम केलंय, यापुढेही करत राहतील हा विश्वास आहे.

हसण्यासाठी जन्म आपुला.. आणि आमचा हसविण्याचा धंदा.. तेव्हा हसत राहा…
सौजन्य – लोकप्रभा