रेश्मा राईकवार

मन फकीरा

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

प्रेमाचा जांगडगुत्ता हा जगभरातील कुठल्याही चित्रपटांसाठी नवीन नाही. या ना त्या प्रकारे प्रेमकथा चित्रपटातून येत राहतातच.. मात्र प्रेमापर्यंत पोहोचण्याआधी मुळात मनाचा गुंता सध्या वाढला आहे हे मान्य करण्याची आपली फारशी तयारी आजही नसते असेच दिसून येते. करिअरपासून प्रेमापर्यंत प्रत्येक गोष्ट जोवर मनाचे समाधान होत नाही तोवर स्वीकारायची नाही, मनाविरुद्धही कुठली गोष्ट स्वीकारायची नाही, यातून येणारी अस्वस्थता हा सध्याच्या पिढीसाठी काळीज कुडतरणारा विषय आहे. हा गुंता सोडवणे आणि तो सोडवताना मिळतील ते धक्के स्वीकारण्याची तयारी ठेवणाऱ्या या पिढीच्या बदलत्या नात्यांची, बदलत्या प्रेमाची ताजीतवानी करणारी गोष्ट मृण्मयी प्रतिभा देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटातून पाहायला मिळते.

चित्रपटाच्या मांडणीपासून, कलाकार, गाणी, व्यक्तिरेखांच्या नजरेतले भाव अचूक टिपतानाच सुंदररीत्या रेखाटलेला भवताल, या सगळ्यात असलेला ताजेपणा हा ‘मन फकीरा’चा सगळ्यात सुखावून जाणारा अनुभव आहे. एका विचित्र गुंत्यातून एकत्र आलेल्या चार व्यक्तिरेखांभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. भूषण (सुव्रत जोशी) आणि रिया (सायली संजीव) दोघांची लग्नाची पहिली रात्र आणि भूषणच्या तोंडून निघालेले भलतेच नाव.. काही दिवसांच्या भेटीतून बोहल्यावर उभे राहिलेले आणि एक मेकाशी आयुष्यभराचे जोडीदार म्हणून जोडले गेलेले हे दोघे.. आपापल्या परीने आपला भूतकाळ विसरून एकत्र यायचा त्यांचा हा प्रयत्न लग्नाच्या पहिल्याच रात्री उघडा पडतो. भूतकाळ विसरून नवे नाते पुढे नेणे शक्य नाही, याची जाणीव झाल्यानंतर भूषण आणि रिया दोघेही एक धाडसी निर्णय घेतात. आपापल्या भूतकाळाला वर्तमानाशी जोडून घेण्याचा, निदान ते नाते चाचपडण्याचा त्यांचा निर्णय किती यशस्वी ठरतो? त्यांचा हरवलेला भूतकाळ त्यांना गवसतो का? हा प्रवास त्यांनाच नाहीतर भूतकाळातील त्यांच्या जोडीदारांनाही कुठल्या वळणावर नेऊन ठेवतो?, हा सगळा सुरेल आणि सुरेख प्रवास म्हणजे ‘मन फकीरा’..

या चित्रपटाचे कथालेखन आणि दिग्दर्शन ही  दोन्ही शिवधनुष्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने पेलली आहेत. दिग्दर्शक म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट आहे, पण तो पहिलेपणा कुठेही जाणवत नाही. उलट, कथेतच तिचे विचार इतके स्पष्ट आहेत की पडद्यावरही ते त्याच प्रभावीपणे उमटतात. दिग्दर्शक आणि लेखक स्त्री असली की आपोआपच त्यातल्या स्त्री व्यक्तिरेखांचे बारीकसारीक कंगोरेही चित्रपटात पाहायला मिळतातच, पण इथे लिंगभेदाच्या पलीकडे जात आपल्या पात्रांना सच्चेपणाने रंगवण्याचे काम लेखक-दिग्दर्शक म्हणून मृण्मयीने केले आहे. त्यामुळे भूषण, रिया, माही (अंजली पाटील) आणि नचिकेत (अंकित मोहन) या चारही व्यक्तिरेखा आपल्याला वेगळ्या वाटत नाहीत. त्या कुठेही आजूबाजूला सहज दिसणाऱ्या अशाच आहेत. या चौघांचाही आपला एक वेगळा स्वभाव आहे, प्रत्येकाची त्यांना आलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांवरून, शिक्षणातून तयार झालेली धारणा आहे. आणि त्यातून त्यांचे असे वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण झाले आहे. आजच्या पिढीप्रमाणे ते हुशार आहेत, महत्त्वाकांक्षी आहेत आणि करिअरच्या बाबतीत जितके ठाम आहेत तितकेच नात्यांच्या बाबतीत आपल्याला नेमके काय हवे आहे, याबद्दल गोंधळलेलेही आहेत. मात्र खऱ्या अर्थाने या चारही व्यक्तिरेखा आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. कथा आणि संवाद दोन्ही बाबतीत चित्रपट जितका सहज आहे, तितकाच ठामही आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घे हा माहीचा हट्ट, गुंता नाजूक हातांनी सोडवला तर सुटूही शकतो, इतक्या साध्या-साध्या संवादातून या व्यक्तिरेखा आपला ‘स्व’ मोकळा करतात. आणि तितक्याच ठामपणे रियासारखी व्यक्तिरेखा मला दुसरा पर्याय बनून राहायचे नाही, हे ठामपणे सांगते.

या चारही व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची अचूक निवड केली आहे. अंजली पाटीलला याआधी इतक्या रफ आणि टफ भूमिकेत पाहायची संधीच मिळाली नव्हती. ती पूर्णपणे वेगळ्या लुकमध्ये आणि माहीसारख्या एकाचवेळी रोखठोक आणि समंजस अशा दोन्हींचा समतोल साधणाऱ्या तरुणीच्या भूमिकेत दिसली आहे. भूषणचे गोंधळलेपण, आपल्या माणसांचा जपण्याचा अट्टहास आणि त्यातूनही आपल्याला जे हवे आहे त्यासाठीची धडपड अशा मध्यमवर्गीय संस्कारात अडक लेल्या तरुणाची भूमिका सुव्रतने त्याच सहजतेने रंगवली आहे. अंकित मोहनचा महत्त्वाकांक्षी नचिकेतही लक्ष वेधून घेतो. मात्र रियाच्या भूमिकेत सायली संजीव भाव खाऊन जाते. कमीतकमी मेकअप आणि वरवर साधी दिसणारी रियाची व्यक्तिरेखा लिहितानाच खूप छान उतरली आहे आणि ती त्यातल्या बारीक छटांसह सायलीने रंगवली आहे. या चौघांच्याही चोख अभिनयामुळे ही चौकडीची प्रेमकथा अधिक रंगत जाते. अर्थात, पूर्वार्धात हा चित्रपट बऱ्यापैकी रेंगाळला आहे, उत्तरार्धात तो अधिक पकड घेतो. ‘मन फकीरा’, ‘तू सांग ना’ या दोन्ही गाण्यांचे बोल आणि संगीत दोन्हीही प्रेमकथेला साजेसे आहे. त्यामुळे या गाण्यांनीही चित्रपटात रंगत आणली आहे. प्रेम, विरह या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे मांडताना अनेकदा भडक नाटय़च घेऊन येतात, मात्र इथे या सगळ्याला फाटा देत मृण्मयीने खूप तरल आणि वास्तव पद्धतीने हा भावनिक गुंता मांडला आहे. प्रेमाची गोष्ट सांगतानाच आजची कुटुंब व्यवस्था, करिअरचे ताणतणाव, असणे आणि नसण्यातले द्वंद्व या सगळ्यावर तिने सहज भाष्य केले आहे. देहभर चांदणे घेऊन प्रकाशणाऱ्या मनांची ही बेफिकीर फकिरी अनुभवण्यासारखी आहे.

* दिग्दर्शक – मृण्मयी प्रतिभा देशपांडे

*  कलाकार – अंजली पाटील, सायली संजीव, सुव्रत जोशी, अंकित मोहन, रेणुका दफ्तरदार, किरण यज्ञोपवित.