गुजरातमधील गोध्रा हत्याकांड घडून २१ वर्षे उलटली आहेत. इतक्या वर्षांनंतरही तिथल्या लोकांच्या मनावरील जखमा अद्याप भरलेल्या नाहीत. हे प्रकरण लोकांच्या स्मरणात कायम आहे. या घटनेवर भाष्य करणारा एक बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘दुर्घटना की षडयंत्र, गोध्रा’ असं या चित्रपटाचं नाव असून एम. के. शिवाक्ष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा टीझर ३१ मे रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाची लोकांना उत्सुकता आहे. अखेर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Accident Or Conspiracy Godhra हा चित्रपट पुढच्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर जारी केलं आहे. नवीन पोस्टरमध्ये रेल्वेची खिडकी आणि बाहेर काही लोक दिसत आहेत. पोस्टरमध्ये ही रेल्वे पेटलेली दिसत आहे. साबरमती एक्सप्रेस असं या रेल्वेचं नाव आहे. २००२ मध्ये घडलेली ही दुःखद घटना आणि पीडितांची खरी गोष्ट रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेता रणवीर शौरी एका वकिलाचा भूमिकेत दिसणार आहे. रणवीर गोध्रा रेल्वे जळीतकांड प्रकरणातील पीडितांची बाजू न्यायालयासमोर मांडताना दिसेल. सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर जारी करण्यात आला होता. एका मिनिटाच्या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. परंतु, त्या घटनेशी निगडित बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. या टीझरमध्ये दावा केला आहे की, हा चित्रपट २००२ च्या गोध्रा हत्याकांड प्रकरणातील सत्य घटनांवर बेतलेला आहे.

साबरमती एक्स्प्रेस, कोच एस ६, ५९ हे अंक यात अत्यंत ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. साबरमती एक्सप्रेसच्या एस६ कोचला आग लावण्यात आली होती आणि मीडिया रिपोर्टनुसार यात ५९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत २,००० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता.

हे ही वाचा >> “…तर मी १०० टक्के लग्न करेन”, अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायका अरोराचे विधान

गोध्रा रेल्वे जळीतकाडांशी संबंधित घटनांवर अनेक चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत. ‘काय पो छे’, ‘परजानिया’, ‘फिराक’सारखे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले होते. परंतु, या नवीन चित्रपटाने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला आहे ते पाहता नक्कीच याची चर्चा होईल, असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranvir shorey godhra movie release date announced director mk shivaaksh asc
Show comments