‘भाऊबळी’ असं काहीसं विचित्र शीर्षक असलेला आणि मराठीतील उत्तम अशा ५० कलाकारांची फौज असलेला चित्रपट म्हणून त्याच्याविषयी एकूणच लोकांमध्ये उत्सुकता होती. चित्रपटाच्या या चित्रविचित्र शीर्षकापासून ते ही गोष्ट नेमकी कोणाची? यातून काय सांगण्याचा दिग्दर्शक आणि निर्माते दशमी प्रॉडक्शन्सचा हेतू होता याविषयी खुद्द दिग्दर्शक समीर पाटील आणि यात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते किशोर कदम, आशय कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

या चित्रपटाविषयी सविस्तर सांगताना दिग्दर्शक समीर पाटील यांनी हा चित्रपट प्रसिध्द लेखक जयंत पवार यांच्या गोष्टीवर रचला असल्याचं सांगितलं. मुळात कथा, पटकथा, संवाद सगळंच जयंत पवार यांचं आहे. त्यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहातील कथेवर आधारित हा चित्रपट आहे. यात एका कुठल्या ठरावीक गोष्टीबद्दल न बोलता आपल्या जगण्यातील अनेक विसंगतींवर त्यांनी बोट ठेवलं आहे. माणूस म्हणून समाजात वावरताना आपण एकमेकांशी कसे बोलतो, कसे वागतो, कसे वागवतो यातली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न पवार यांनी कथेतून केला आहे. आजच्या घडीला सुसंगत अशी ही गोष्ट योग्यपद्धतीने चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, असं समीर यांनी सांगितलं.

भाऊबळी कुठून आलं?

हल्ली लोकांचे कुठल्याही गोष्टीवरून चटकन समज आणि गैरसमज होतात. ते याबाबतीत होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. प्रेक्षकांना पटकन आवडेल असं नाव हवं होतं. बाहुबलीचं गारूड लोकांवर होतंच, शिवाय या कथेत भाऊ आणि बळी अशी दोन पात्रं आहेत. आणि त्यांची गोष्ट असल्याने ओढूनताणून काही न करता सहजगत्या हे शीर्षक जमून आलं, अशी माहिती समीर यांनी दिली.

सौमित्र आणि जयंत पवार..

जयंत पवारांबरोबर मैत्रीचे धागे कसे जुळले, याविषयीची आठवण अभिनेते किशोर कदम यांनी सांगितली. ‘अधांतर’ या नाटकानंतर जयंत पवारांचा साहित्य – नाटक  वर्तुळात प्रवेश झाला. माझं इंग्रजी वाचन चांगलं असल्याने मी त्याला काही चांगली इंग्रजी पुस्तकं सुचवावीत असं त्याने मला सांगितलं होतं. त्यामुळे मी त्याला सगळय़ात आधी मीलन कुंदेरा नावाच्या झेकोस्लोव्हाकियन लेखकाची ओळख करून दिली. त्याचं ‘लाईफ इज एल्सवेअर’ नावाचं पुस्तक आणि गॅब्रिएल गार्सिया मार्कीजचं ‘वन हंड्रेड इअर्स टु सॉलिटय़ुड’ हे पुस्तक दिलं.  त्यानंतर जयंतने खूप काळ नाटय़लेखनापासून फारकत घेतली आणि तो लॅटिन अमेरिकन साहित्य वाचत राहिला, विचार करत राहिला, पचवत राहिला. त्यानंतर खूप वर्षांनी त्याने कथासंग्रह लेखनाला सुरुवात केली. त्याच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. जयंतच्या कथेवर चित्रपट बनतो आहे. नितीन वैद्य आणि अपर्णा पाडगावकरसारखे निर्माते आणि समीर पाटीलसारखा मित्र दिग्दर्शक चित्रपट करतो आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती, असं त्यांनी सांगितलं.

कुठलीही भूमिका एकसाची नसते

एखादी भूमिका विनोदी आहे किंवा गंभीर आहे असा विचार कलाकार करत नाही, कारण कुठलीही भूमिका एकसाची नसते. भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे विनोदी नट आहेत, पण वास्तव आयुष्यात त्यांचा स्वभाव विनोदी नाही. तसं चित्रपटातही एखादी विनोदी व्यक्तिरेखा असेल तर ती तशी असण्यामागे काहीएक गंभीर कारण असतं ते कलाकार म्हणून शोधता आलं पाहिजे, असं किशोर कदम यांनी सांगितलं.

पहिलीच आव्हानात्मक भूमिका..

आशय कुलकर्णीचा या तरुण कलाकाराचा चेहरा मालिकांमुळे आता घराघरात लोकप्रिय झाला आहे. मात्र मालिका करण्याआधीच मी ‘भाऊबळी’ हा चित्रपट केला होता, असं सांगत आशयने धक्का दिला. आत्तापर्यंत माझ्या दिसण्यावरून मला कायम ठरावीक पध्दतीच्या भूमिका मिळाल्या. निम्न आर्थिक स्तरातून आलेला मुलगा मी वाटू शकेन, असा विश्वास पहिल्यांदा समीर पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे माझी ही पहिलीच वेगळी भूमिका आहे, असं आशय सांगतो. मराठीत अजूनही प्रेक्षक मोठय़ा प्रमाणावर मराठी चित्रपट पाहायला जात नाहीत. दक्षिणेकडे जसं लोक आपलं कर्तव्य असल्यासारखं त्यांच्या भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात तेच आपल्याकडे व्हायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करत या तिघांनी गप्पांचा समारोप केला.

गुलजार भेट

प्रसिध्द गीतकार गुलजार यांच्याशी किशोर कदम म्हणून आपली पहिली भेट कशी झाली होती हे मी आजवर कोणाला सांगितलेलं नाही, असं सांगत किशोर यांनी हा खास आठवणीतला किस्सा सांगितला. गुलजार यांच्या पहिल्या भेटीत मी त्यांना माझी ‘गालिब कुठे आहेस’ ही कविता ऐकवली होती. मी मुळातच चाणाक्ष नट असल्याने गालिब ही त्यांची दुखती रग आहे हे जाणून होतो. तेव्हापासून ते माझे मित्र झाले. पण त्यांची पहिलीवहिली भेट ही फार गमतीशीर गोष्ट आहे. हंसल मेहताच्या ‘जयते’ नावाच्या चित्रपटाचं आम्ही चित्रीकरण करत होतो. त्यावेळी हंसलने सांगितलं, गुलजार साब ‘हुतूतू’ नावाचा चित्रपट करत आहेत त्यात तुला भूमिका मिळूच शकते. तू जाऊन भेट तर त्यांना.. आता गुलजार साब इतके मोठे. त्यांची गाणी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. माझ्या घरापासून पंधरा मिनिटावर ते राहतात. माझी आई अजून त्याच परिसरात राहते. तर गुलजार इथे राहतात हे माहिती आहे. त्यांचा तो बंगला पाहिलेला आहे. त्यांनी ‘इजाजत’ केला आहे, ‘दिल ढुंढता है’सारखी गाणी त्यांनी लिहिली आहेत. तो माणूस इथे राहतो, आता तो आतमध्ये असेल का? असे विचार करत आयमुष्य गेलं. त्यांची आणि माझी दोस्ती व्हावी अशी मनात खूप इच्छा आहे. आता त्यांना भेटायचंच असा निर्धार करून त्यातल्या त्यात चांगले कपडे घालून मी बंगल्याच्या गेटवर गेलो. गेट बंद होतं, जरा ढकललं तर ते उघडं होतं. बघितलं तर समोर त्यांची काळी गाडी होती. पुढे घरात शिरलो तर तिथे सगळं शांत. एका बाजूला मूत्र्या होत्या. तिकडे दोन खोल्या, पुस्तकं, फाईल्स सगळं दिसत होतं. एका बाजूने जिना वर जात होता. कोणाची चाहूलच नव्हती घरात.. नोकर नव्हते. मी इकडे तिकडे बावचळून बघतो आहे तेवढय़ात टक टक आवाज आला आणि रेलिंगवरून एक हात खाली येताना दिसला. पांढराशुभ्र सदरा आणि पायात मोजडी अशा रूपात पुढे आलेल्या गुलजार यांनी कोण आहेस? म्हणून मला विचारलं. मला काहीच सुचलं नाही. ततपप..करत  मी तिथून सरळ धूम ठोकली, ही माझी त्यांच्याशी झालेली पहिली खरी भेट. त्यानंतर दोन वर्षांनी माझी मैत्रिंणी प्रीती मला त्यांच्याकडे घेऊन गेली तेव्हा मी त्यांना माझी ‘गालिब कुठे आहेस’ ही कविता ऐकवली. पण, मी त्यांना आधी अशा पद्धतीने भेटलो होतो हे अजून मी त्यांना सांगितलेलं नाही, असं किशोर सांगतात.

दुबेजींचं घराणं

अभिनयातील आपले गुरू सत्यदेव दुबे यांच्याविषयीही किशोर कदम भरभरून बोलतात. ‘सगळय़ा गोष्टी करून बघाव्यात आणि तुमचा जो स्थायीभाव असतो त्याच्याशी जे जुळतं ते करत राहावं असं दुबेजींनी शिकवलं’, असं ते सांगतात. त्यांच्याकडे दहा वर्ष शिकत असताना त्यांचं एक मात्र होतं की माझ्याकडे शिकत असताना दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाकडे काम करायचं नाही. आपल्याकडे संगीतातली कशी घराणी असतात, तसं दुबेंजींचं अभिनयाचं घराणं होतं. तू माझ्या घराण्याचं शिकण्यावर लक्ष केंद्रित केलंस आणि त्यातलं पन्नास टक्के जरी आत्मसात केलंस तरच तुला दुसऱ्या घराण्यातलं शिकण्याने फरक पडेल. नाहीतर तू हेही केलंस, तेही केलंस तर तुला सगळय़ातलं थोडं थोडं कळेल. एक गोष्ट कुठलीही स्पष्ट कळणार नाही, ही त्यांची भूमिका होती, असं किशोर यांनी सांगितलं.