‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर आता डॉ. निलेश साबळे एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीने ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये निलेश साबळेसह भाऊ कदम, ओंकार भोजने हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून निलेश साबळे पुन्हा एकदा लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी तिहेरी जबाबदारी पार पाडणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील बरीच मंडळी या शोचा भाग असणार आहेत. स्नेहल शिदमसह आणखी एक अभिनेत्री या नव्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचं नाव आहे सुपर्णा श्याम.

हेही वाचा : “मी भत्ता घेणार नाही, एक लाडू घेतला तरी…”, सिद्धिविनायक मंदिराच्या वादावर आदेश बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

अभिनेत्री सुपर्णा श्याम यापूर्वी ‘बंध रेशमाचे’, ‘दुहेरी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘दुहेरी’ अशा अनेक मालिकेत झळकली होती. गेल्यावर्षी ती अभिनेता संकेत पाठकबरोबर विवाहबंधनात अडकली. संकेत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून सुपर्णाने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. त्यामुळे आता ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ती प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाली आहे.

हेही वाचा : सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न

दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा शो येत्या २० एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, सुपर्णा श्याम यांच्या भूमिका असणार आहेत.