ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग २२ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. नाटय़, चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
जिगिषा आणि अष्टविनायक या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ८ नोव्हेंबर २०१४ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पुन्हा एकदा नव्याने सादर झाला होता. वैदर्भीय बोलीतील या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून तीन पिढय़ांच्या प्रेक्षकांनी हे नाटक पाहिले आहे. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगानंतर नाटकाचे महाराष्ट्राबाहेर दौरे होणार आहेत. इंदुर, अहमदाबाद येथे प्रयोग करण्याचे निश्चित झाले आहे. ‘वाडा चिरेबंदी’च्या नव्या प्रयोगात निवेदिता जोशी-सराफ, भारती पाटील, वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे हे कलाकार आहेत. तीस वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर यांनी निर्माता म्हणून सादर केले असून संज्योत वैद्य व अर्जून मुद्दा हे सहनिर्माते आहेत.