News Flash

मुंबईत करोना रुग्णाचा मृत्यू

कस्तुरबामध्ये रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते.

एरव्ही पर्यटकांच्या गर्दीने भरून गेलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शुकशुकाट आणि करोनाची भीती जाणवत होती.

 

घाटकोपरमध्ये नवीन रुग्णाची नोंद

मुंबई :  दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उच्च रक्तदाबाचा दीर्घकालीन आजार असलेल्या या रुग्णाचा न्यूमोनियासह हदयामध्ये संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचे पालिकेने स्पष्ट के ले आहे. करोनाचा देशातील हा तिसरा बळी असून याआधी कर्नाटक आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

दुबईहून ५ मार्चला हा रुग्ण देशात परतला होता. ७ मार्चला त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयविकार असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ८ मार्चला हिंदुजामध्ये दाखल केले. तपासण्यांमध्ये श्वास घेण्याचा त्रास हा  विषाणू संसर्गामुळे होत असल्याचा संशय आल्याने त्यांचे नमुने १२ मार्चला कस्तुरबामध्ये पाठवण्यात आले. चाचण्यांमध्ये करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना १३ मार्चला कस्तुरबामध्ये पुढील उपचारासाठी दाखल के ले.

कस्तुरबामध्ये रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने अधूनमधून कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांना उच्चरक्तदाबासह हृदयविकारही होता. तसेच न्यूमोनिया आणि हृदयाला संसर्ग झाला होता. हृदयाला सूज आल्याने आणि ठोके वाढल्याने सोमवारी संध्याकाळी प्रकृती गंभीर होत गेली. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिके च्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

रुग्णाच्या थेट संपर्कोत असलेली त्यांची पत्नी आणि मुलालाही करोनाचा संसर्ग झालेला असून कस्तुरबामध्येच उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले. त्यांच्या  कुटुंबीयांनी सूचित केलेल्या दादर येथील स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनीमध्ये मृतदेहाचे दहन करण्यात आले.

विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या दोन जणांना त्यांना पाहता आले. मात्र अन्य जवळील आणि मोजक्याच नातेवाईकांना काचेच्या आवरणातून त्यांचा चेहरा दिसेल अशी सुविधा करण्यात आली होती. हा मृतदेह पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला होता, संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घेतली गेली  असल्याचे पालिकेचे उपायुक्त डॉ. सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अंधेरीतील महिलेच्या प्रकृतीत सुधारणा

अंधेरीत आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीची प्रकृती सुधारत असून तिची दुसरी तपासणी नकारात्मक आली आहे. रुग्णाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा चाचणी केली जाते. या महिलेची ही चाचणी नकारात्मक आली असली तरी पुन्हा पाच दिवसांनी चाचणी केली जाईल. १४ दिवसांनी पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. ती चाचणी नकारात्मक आल्यास  ही महिला संसर्गमुक्त असल्याचे जाहीर करून तिला घरी सोडले जाईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अमेरिके हून आलेल्या प्रवाशाला संसर्ग

मुंबईत आणखी एका प्रवाशाला करोनाचा संसर्ग झाला आहे.  घाटकोपर येथे ४९ वर्षीय पुरूषाला करोनाचा संसर्ग झाल्याने कस्तुरबामध्ये दाखल के ले आहे. हा रूग्ण अमेरिके हून प्रवास करून ७ मार्चला देशात परतला होता. याच्या थेट संपर्कात ११ व्यक्ती आल्या असून त्यातील चार जणांना कस्तुरबामध्ये विलगीकरण कक्षामध्ये दाखल के ले आहे. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या १५ झाली आहे. सध्या कस्तुरबामध्ये १२३ रुग्ण दाखल आहेत. कस्तुरबामध्ये दाखल असलेल्या आणखी एका रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाली असून त्यालाही कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:15 am

Web Title: corona patient dies in mumbai akp 94
Next Stories
1 ‘करोना’चर्चेसाठीच्या बैठकीत रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव
2 बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभाग
3 पालिका कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे
Just Now!
X