मुंबई शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या मराठीसह अन्य भाषिक शाळा बंद पडत असून ही चिंतेची बाब आहे. या शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती आणि शाळा बंद पडण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण समितीची विशेष बैठक बोलाविण्यात येणार आहे. अपुऱ्या विद्यार्थी संख्येमुळे पालिकेच्या ११ शाळा बंद करण्यात आल्या असून यात चार मराठी शाळांचा समावेश आहे.
या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. त्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांवर पालकिा कोटय़वधी रुपये खर्च करते, दरवर्षी या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू देण्यात येतात तरीही या शाळा बंद कशा पडतात, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. उर्दू आणि हिंदी वगळता सर्व भाषिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून विद्यार्थ्यांची ही गळती रोखण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत त्यावर चर्चा करण्यासाठी शिक्षण समितीची विशेष बैठक बोलाविणार असल्याचे शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज कोटक यांनी सांगितले. गणेशनगर पालिका मराठी शाळा (घाटकोपर), वीर संभाजीनगर मराठी शाळा (मुलुंड), सुभाषनगर पालिका मराठी शाळा (भांडूप) या तीन शाळा बंद होणार असून धनजी देवजी पालिका मराठी शाळा (घाटकोपर) ही शाळा स्थलांतरित होणार आहे.