औषध विक्रेत्यांनी औषधे खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघटनेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. औषधविक्रीचे योग्य परवाने असल्यास कमी गुंतवणुकीमध्येही फार्मासिस्ट म्हणून उद्योग सुरू करता येईल, असा दिलासा अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी औषध विक्रेत्यांना दिला आहे.
राज्यातील सर्व घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते आपले परवाने अन्न आणि औषध प्रशासनास सोमवारी परत करणार आहेत.
 या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र फार्मसिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी झगडे यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे निवेदन सादर केले. ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर अ‍ॅक्ट’ या कायद्यानुसार योग्य परवाना असेल तर कमी गुंतवणुकीमध्ये कोणीही औषध विक्रेता म्हणून व्यापार सुरू करू शकतो. त्यांना औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी कमी गुंतवणुकीमध्ये उत्पादन दिले नाही तर त्यांच्या विरोधात तक्रार करता येईल, असेही झगडे यांनी सांगितले. घाऊक औषध विक्रेता होण्यासाठी ‘औषध विक्रेता’ किंवा ‘फार्मास्युटिकल होलसेलर असोसिएशन’ या संघटनेचे सदस्य होण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले.