उरणमधील रानसई धरणाच्या परिसरात असलेल्या कंठवली गावाजवळच्या तलावात सोमवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेल्या नवी मुंबईतील नेरुळच्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून मृत तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यात मंगेश तानाजी घोरपडे (१९), संकेत सहदेव धुरी (२०) व शैलेश तानाजी कडाळे (१९) यांचा समावेश आहे.
नेरुळ परिसरातील दहा मित्र उरणच्या रानसई धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दुपारी जेवण केल्यानंतर रानसई धरणाशेजारीच असलेल्या एका ओढावजा तलावात पोहताना फोटो काढण्याचा मोह झाला. या वेळी एक जण पाण्यात पोहण्यासाठी उतरला तर दोघे जण त्याचा फोटो काढत होते. पाण्यात उतरलेल्या तरुणाला पोहता येत नसल्याने तो बुडत असल्याचे पाहून फोटो काढणारा दुसरा त्याला बाहेर काढण्यासाठी उतरला तर तोही बुडू लागल्याने तिसऱ्याने प्रयत्न केला. मात्र स्वत:ला वाचण्यासाठी तिघांनीही एकमेकांना ओढल्याने तिघेही बुडाले.
या तिघांना त्यांच्या उर्वरीत सात मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यापैकी एकालाही पोहता येत नसल्याचे त्यापैकी एकाने सांगितले. तर घटना घडल्यानंतर गावकऱ्यांकडून आपण मदत मागितली मात्र ती मिळाली नसल्याचीही खंत त्याने या वेळी व्यक्त केली.