मुंबई: गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सनदी लेखापाल अंबर दलाल याच्याविरोधात आतापर्यंत ६२८ तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत. त्यांची एकूण ५७९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान दलालकडे एक हजार अधिक गुंतवणूकदारांनी एक हजार कोटीं रुपयांहून अधिक रक्कम गुंतवल्याचा संशय असून त्यात अमेरिका व दुबईतील रहिवासी, अनिवासी भारतीयांचा समावेश असल्याचा संशय आहे. याप्रकरणात दलालला न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दलालने अमेरिकेतील नागरिक, अनिवासी भारतीयांची एकूण ३८९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदाराकडून करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात अद्याप याबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दलालचे गुंतवणूकदार कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना येथील असल्याचे गुंवणूकदाराचा दावा आहे. तपासणीत पोलिसांना दलालकडून अमेरिका व दुबईचे सीमकार्ड मिळाले आहे. तसेच त्या क्रमांकावरून परदेशातही संपर्क करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणच्या उमेवारीवरून ठाकरे गटात सावळागोंधळ, ट्विटरवरून स्वतःच केली उमेदवारी जाहीर, नंतर ट्विट डिलीट

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणूकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने तक्रारदार महिलेची अंबर दलालशी ओळख करून दिली होती. त्याने तिला गुंतवणुकीवर आकर्षक नफा देऊ केला. तसेच प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुन्हा दाखल होणाच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ मार्च रोजी अंबर दलालने पलायन केले. याप्रकरणी आतापर्यंत २० बँक खाती गोठविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ३६ बँकांशी संपर्क साधून आरोपीच्या बँक खात्यांबाबत माहिती मागवली आहे. याशिवाय त्यांच्या मालमत्तांबाबतची माहितीही पोलीस घेत आहेत.