नागपूर: महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी आपली निवड झाली आहे. आपले नाव आम्हाला एमपीएससीच्या सदस्यांकडून समजले आहे. मुलाखतीमधील गुण वाढविण्यासाठी आम्ही मदत करू शकतो. इच्छा असल्यास आपण संपर्क साधू शकता, असे फोन गेल्या महिन्या-दोन महिन्यात उमेदवारांना आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी स्टूडंट्स राईट्स असोसिएशनने एमपीएससीच्या अध्यक्षांकडे केली आहे.

एमपीएससी या स्वायत्त संस्थेवर राज्यातील लाखो उमेदवारांचा विश्वास आहे. अशाप्रकारे कोणी गैरकृत्य करुन त्या विश्वासाला तडा देत असेल तर ते योग्य नाही. उमेदवारांचे मोबाईल नंबर कसे उपलब्ध होत आहेत ? कोणत्या पॅनलला तुमची मुलाखत येणार आहे हे सांगितले जात आहे. अशी गोपनीय माहिती कशी काय बाहेर येत आहे? कोणत्या अधिकाऱ्याच्या संमतीने ही माहिती बाहेर येत आहे, याचा शोध घेणे महत्वाचे आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून आयोगाने याबाबत एक समिती गठित करुन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा – इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी मुलाखत देणे बंधनकारक आहे. हीच उमेदवारांची दुखरी नस पकडून काही व्यक्तींकडून मुलाखतीसाठी एमपीएससीच्या सदस्यांची नावे सांगितले जात आहेत. निनावी फोनद्वारे मुलाखतीमध्ये गुण वाढवून देतो. तुमच्या मुलाखतीच्या पॅनेलमध्ये अमुक सदस्य असणार आहेत. आमची त्यांच्यासोबत ओळख आहे, असे सांगितले जात आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या काही दिवस आधी व मुलाखत झाल्यानंतरही घडला आहे. एमपीएससीतील सदस्यांचे नाव घेऊन निनावी फोनद्वारे उमेदवारांशी संपर्क साधण्यात आला आहे. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये भीती पसरली आहे. भीतीपोटी उमेदवार बोलत नव्हते. मात्र नैराश्य येत असल्याने काही उमेदवारांनी असोसिएशनशी संपर्क साधून हा प्रकार घडल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याची दखल घेत असोसिएशने ही बाब एमपीएससीच्या निदर्शनास आणून दिली आहे.

हेही वाचा – सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…

एमपीएससीच्या भूमिकेकडे लक्ष

२००२ साली एमपीएससीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात एमपीएससीची झालेली बदनामी ही कधीही भरून निघणारी नाही. त्यानंतर असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी एमपीएससीने घेतलेले परिश्रम व त्यानंतर एमपीएससीला मिळालेला मानसन्मान पुन्हा संपू नये एवढी अपेक्षा आहे. एमपीएससीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र स्टूडंट्स राईट्स असोसिएशने दिले आहे.