मुंबईः जयपूर-मुंबई विमान प्रवासादरम्यान विमानात धुम्रपान करताना प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अर्जुन राम ठालोर (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात विमान अधिनियम १९३७ अंतर्गत सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारदार ओम रमेश देशमुख घाटकोपर येथील असल्फा परिसरात राहतात. ते गेल्या पाच वर्षांपासून एका विमान कंपनीत सहयोगी सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता जयपूर विमानतळावरुन मुंबईला जाणार्‍या एका विमानाने उड्डाण केले होते. त्यात अर्जुन ठालोर हा प्रवासी होता. विमानात सर्व प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी धुम्रपान मनाईबाबतचे चिन्ह लावण्यात आले होते. तसेच जयपूरहून विमान उड्डाण करण्यापूर्वी वरिष्ठ कर्मचारी काजोल घाग यांनी विमानात धुम्रपान करण्यास मनाई असल्याची घोषणा केली होती. तरीही सव्वासात वाजता अर्जुन हा शौचालयात गेला आणि त्याने धुम्रपान केले. हा प्रकार तेथे कामाला असलेल्या एका महिलेच्या निदर्शनास येताच तिने तिच्या वरिष्ठांना ही माहिती दिली.

हेही वाचा – कपिल पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? विधान परिषद न लढण्याचा निर्णय

हेही वाचा – आत्मविश्वास, निश्चय, सातत्य हाच यशाचा मार्ग-मनुज जिंदल

मुंबई विमानतळावर विमान उतरताच त्याला विमानतळावरील सुरक्षारक्षकाच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी भादवीसह विमान अधिनियमन १९३७ अंतर्गत गुन्हा दाखल होताच अर्जुन ठालोरला पोलिसांनी अटक केली.