मुंबई : पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणाऱ्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) या संस्थेच्या २६ अभ्यासक्रमांची मान्यता राज्य सरकारने गतवर्षी रद्द केली होती. सीपीएसने अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्धारित मानकांनुसार सीपीएसच्या १० अभ्यासक्रमांना मार्चमध्ये पुन्हा मान्यता दिली. मात्र मान्यतेनंतरही गतवर्षीच्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया अद्याप वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या ५०० जागांसाठी निवड झालेले विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळणारे आणि आर्थिक क्षमता नसलेले अनेक विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी सीपीएसशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांना प्राधान्य देतात. या संस्थेतील अभ्यासक्रमांचा दर्जा हा आयोगाने निर्धारित केलेल्या मानकांनुसारच असतो. त्यामुळे सध्याच्या घडीला देशातील सात राज्यांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सीपीएसचे अभ्यासक्रम शिकविले जातात. यामध्ये प्रामुख्याने गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आसाम या राज्यांचा समावेश आहे. मात्र १४ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सीपीएसशी संलग्न महाविद्यालयांमध्ये काही त्रुटी असल्याचे सांगत सीपीएसच्या २६ अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली.

हेही वाचा…उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था

यामुळे राज्यामध्ये सीपीएस अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. सीपीएसने हा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका घेत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे धाव घेतली. त्यानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्धारित मानकांनुसार असलेल्या सीपीएसच्या १० अभ्यासक्रमांना १५ मार्च २०२४ रोजी मान्यता दिली. यामध्ये नेत्रविज्ञान, त्वचाविज्ञान, वैद्यकशास्त्र, रोगनिदानशास्त्र, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, पॅथॉलॉजी, बाल आरोग्य पदविका अभ्यासक्रम, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र पदविका अभ्यासक्रम, डिफ्यूज पॅनब्रोन्कोलायटिस यांचा समावेश आहे. सीपीएसद्वारे दोन वर्षांचा पदविका आणि तीन वर्षांचा फेलोशिप अभ्यासक्रमांचा कार्यकाळ रितसर पूर्ण केल्यानंतर डॉक्टरने एक्झिट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच्या त्यांना विशेषज्ञ म्हणून नोंदणी करण्यास मान्यता देण्यात येते.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सीपीएसच्या १० अभ्यासक्रमांना मान्यता दिल्यामुळे गतवर्षी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र मान्यतेनंतरही या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण व सशोधन संचालनालयाकडू राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे गतवर्षीचे जवळपास ५०० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू केल्यास गतवर्षीच्या विद्यार्थ्यांबरोबर यंदा प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार असल्याची माहिती सीपीएसचे अध्यक्ष डॉ. अजय सांबरे यांनी दिली.

हेही वाचा…Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

उर्वरित अभ्यासक्रमांसाठी समितीची शिफारस

सीपीएसच्या १० अभ्यासक्रमांना पुन्हा मान्यता दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या चर्चेमध्ये उर्वरित १६ अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी सकारात्मकता दर्शवली आहे. महाराष्ट्रामध्ये सीपीएसच्या १०८१ जागा असून, त्यातील ५८५ जागा केंद्रीय स्तरावर नीटमार्फत तर उर्वरित जागा या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून भरल्या जातात.