लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: रिक्षा चालकांच्या मनमानी विरोधात रविवारी मुलुंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना महिला कार्यकर्त्यांनी फुलांचा हार घालून त्यांना समज दिली. तसेच यापुढेही मनमानी सुरू राहिल्यास वाहतूक पोलिसांना देखील हार घालण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मुलुंडच्या डी मार्ट परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन आणि मीटरप्रमाणे भाडे न घेता अवाजवी भाडे प्रवाशांकडून आकारणे असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. डी मार्ट पासून काही अंतरावरच वाहतूक पोलिसांची बीट चौकी आहे. मात्र प्रवाशांच्या तक्रारीनंतर देखील वाहतूक पोलीस रिक्षा चालकांवर काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा-मुंबईतील मॅकडोनाल्डसह ३० फास्टफूड दुकानांना नोटीस

काही प्रवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) महिला कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार रविवारी या महिला कार्यकर्त्यांनी डी मार्ट बाहेर असलेल्या रिक्षा चालकांना गाठून त्यांना फुलांचा हार घालून आंदोलन केले. तसेच वाहतूक पोलिसांनी देखील याबाबत लक्ष घालून आशा मुजोर रिक्षा चालकांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation against rickshaw driver who refusing fares mumbai print news mrj