मुंबई : अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत करून गेली ४ वर्षे तरुणीची बदनामी करणाऱ्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरोधात पंजाब पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर काढले होते. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दुबई व मलेशिया येथे वास्तव्याला होता. आरोपी हरज्योतसिंह सुखदेवसिंहने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपीने मोबाईलवर त्याचे चित्रीकरण केले. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिची चित्रफीत समाजमाध्यमांवर वायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

आरोपीने संबंधित छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर पीडित मुलीने याप्रकरणी पंजाब पोलिसांकडे आरोपी हरजोतसिंहविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याच्या धमकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पंजाबहून दुबईला पळून गेला होता. तपासात तो विदेशात पळून गेल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले होते.

हेही वाचा – आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती, एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट

हेही वाचा – मुंबई: सोन्याच्या तस्करीप्रकरणी वर्षभरानंतर आरोपीला अटक

दुबई आणि मलेशिया येथे राहिल्यांनतर दोन दिवसांपूर्वी हरजोतसिंह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्यावेळी अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले. ही माहिती नंतर सहार पोलिसांकडून पंजाब पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. रविवारी या पथकाने हरजोतसिंहचा ताबा घेतला आहे.